हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

निपाणी (कर्नाटक) येथील घटना !

निपाणी (कर्नाटक) – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना २२ ऑक्टोबर या दिवशी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत मिळवली. ही मोहीम यशस्वी करण्यात विरुपाक्षलिंग समाधी मठाचे भक्तगण, श्रीराम सेना कर्नाटक, वारकरी संप्रदाय, बजरंग दल निपाणी आणि निपाणी भागातील गोरक्षक यांनी सहभाग घेतला.

प्रारंभी गोपालक असल्याची बतावणी करणारी व्यक्ती काहीही थांगपत्ता लागू देत नव्हती. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘गाय परत न आल्यास याचे गंभीर परिणाम होतील’, अशी चेतावणी देताच या व्यक्तीने संपर्क करून गाय परत आणून दिली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणात सहभागी अन्य कसायांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले आणि त्यांच्याकडून ‘परत गोतस्करी करणार नाही’, असे लिहून घेतले. सुमारे ४ घंटे गायीला परत मिळवण्याची मोहीम चालू होती. या प्रकरणात व्यय करण्यात आलेले ९ सहस्र रुपये हिंदुत्वनिष्ठांनी निपाणी येथील समाधी मठाच्या गोशाळेस अर्पण दिले.