पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान
पंढरपूर – अहिल्यानगर येथील विठ्ठलभक्त श्री. अनिल एकनाथ खेडकर हे सध्या लंडन येथे स्थायिक आहेत. ते लंडन येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे मंदिर साकारणार आहेत. त्यासाठी ते पंढरपूर ते लंडन अशी श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या पादुकांची दिंडी काढत असून त्या निमित्ताने १४ एप्रिलला पादुकांसह दिंडी श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांसह अन्य उपस्थित होते.
लंडन येथे होणार्या या मंदिराच्या निमित्ताने ही दिंडी १४ एप्रिल ते २१ जून पंढरपूर ते लंडन अशी काढण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देतांना अनिल खेडकर म्हणाले, ‘‘मी गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहे. अमेरिका, युरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत; मात्र श्री विठ्ठल मंदिर नाही. त्यामुळे मी वारी साता समुद्रापलीकडे नेण्यासाठी हे मंदिर बांधत आहे. खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात; पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात. यासाठी सुमारे २२ देशांतून १८ सहस्र किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार आहे.’’
आता ही दिंडी १८ एप्रिलला भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा २२ देशांतून ७० दिवसांत १८ सहस्र किलोमीटर एवढा प्रवास दुचाकीने करणार आहे.