रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

निवळी (ता. चिपळूण) येथील पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत. (पूज्य सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला आहे.)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510053.html

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (उजवीकडे) यांच्यातील भावभेटीचे संग्रहित छायाचित्र

२३. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया हा साधनेचा गाभा असणे; परंतु समाज किंवा संप्रदाय यांमध्ये कुणीच ही प्रक्रिया करायला शिकवत नसल्याने लोक ताणामध्ये असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. सखाराम बांद्रे महाराज : मला वाटते, ‘सगळा हिंदुस्थान या आश्रमासारखा, म्हणजे टापटीप, स्वच्छ आणि हसतमुख माणसे असणारा असावा.’ सुशिक्षित भागामध्येही माणसे हसत का नाहीत ? मुंबईमध्ये किती महागडे बंगले आणि मोठमोठ्या इमारती आहेत. तिथली माणसे असे (आश्रमातील साधकांप्रमाणे) गोड का बोलत नाहीत ? हसत का नाहीत ? सगळीकडे तणाव दिसतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. त्यांना स्वभावदोष निर्मूलन करायला कुणी शिकवले नाही.

पू. सखाराम बांद्रे महाराज : हो. कुठल्याच संप्रदायामध्ये स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ती प्रक्रिया न केल्यामुळे काळजी, निराशा, राग, असा कुठला ना कुठला स्वभावदोष उफाळून येतो. अशा ठिकाणी देव कसा रहाणार ? साधनेतील मूळ काय आहे ? स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् भावजागृती ! भाव असेल, तिथे देव येतो. अहं निर्मूलन झाले की, देवापासून दूर कुणी रहाणार आहे का ? समाजात स्वभावदोष निर्मूलनाचा प्रचार करतो ना, त्याचे फळ मग येणारच आहे.

पू. सखाराम बांद्रे महाराज : बरोबर आहे. हीच खरी चावी आहे. ही चावी न सापडल्याने समाजाला किंवा कुठल्याही संप्रदायाला कुलूप उघडता आलेले नाही. (साधनेचे मर्म समजलेले नाही.)

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपले प्राधान्य तेच आहे.

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

२४. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सर्व विकार नष्ट व्हायला साहाय्य होत असल्यामुळे ही प्रक्रिया इतरांना शिकवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होणे सुकर होईल !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले 

पू. सखाराम बांद्रे महाराज : देहात ईश्‍वर आहे. केवळ शरीर चांगले असून चालत नाही. देहात विकारही असतात. ते सूक्ष्म असल्याने ते जिवाला आतून हैराण करतात. या विकारांचे निरसन केल्याविना, म्हणजेच देह आतूनही स्वच्छ, पवित्र आणि निकोप केल्याविना परमेश्‍वर आतमध्ये येणार कसा ? घाणीवर माशा बसतात, तशा आतमध्ये माशा बसल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : इतर हिंदु धर्मप्रचारकांमध्ये त्या माशा येऊ द्यायच्या नाहीत आणि ‘त्या नष्ट कशा करायच्या ?’, हेच तुम्हाला शिकवायचे आहे. तुम्ही इतके दिवस सनातन संस्थेच्या माहितीच्या ध्वनीचित्र चकत्या (सीडी) पाहिल्या आहेत. आता ‘समाजात सनातन संस्थेचा प्रचार कसा चालतो ? सहस्रो सात्त्विक लोक कसे सिद्ध होतात ?’, ते पहाणे आणि शिकणे यांसाठी तुम्ही इतरही ध्वनीचित्र चकत्याही (सीडी) पहा. तुम्ही काही दिवस इथे रहा. त्या संदर्भातील ग्रंथही वाचा. हे सगळे केले की, ‘वैद्यकीय महाविद्यालयात शिकून एखादा डॉक्टर झाल्यावर तो डॉक्टरी करतो’, तसे होईल. म्हणजे तुम्हाला काही तरी करण्याची इच्छा आहे; पण ‘ते इतरांना शिकवायचे कसे ?’, हे तुम्हाला इथे शिकता येईल. कीर्तनकार किंवा प्रवचनकार ‘लोकांनी काय करायचे ? त्यांच्यामध्ये कुठले गुण असले पाहिजेत ?’, हे सांगतात; पण त्यांना ते गुण स्वतःत निर्माण करता येतात का ? इतके महाराज होऊन गेले. काय केले त्यांनी ? यापेक्षा वाईट उदाहरण काय ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : काही नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही ते इकडे राहून शिकून घ्या. उद्यापासून तुमचे दिवसाचे वेळापत्रक वेगळे करा, म्हणजे आपण समाजात गेल्यावर आपल्याला ते समाजालाही शिकवता येते. सगळीकडे सनातनचे सत्संग असतात. त्या सत्संगात हेच असते. सत्संगात ‘सगळे चांगले गुण कसे आत्मसात करायचे ? चांगला साधक कसे व्हायचे ?’, हे प्रत्यक्ष शिकवतात. आता तिकडे लक्ष द्या. मग २-३ मासांनी ‘इतरांनी काय करायचे ?’, ते शिकवायला जायचे. ‘स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही गुण निर्माण करायचे. आपले स्वभावदोष पूर्ण घालवायचे आणि इतरांनाही त्यासाठी साहाय्य करायचेे’, ही व्यष्टी अन् समष्टी साधना आहे. तुमच्यात एकही स्वभावदोष नाही, तर गुण आहेत. त्यामुळे तुम्ही साधकांना शिकवून त्यांना सिद्ध करायचे. ते केले की, तुमची समष्टी साधना होईल.

२५. गावागावांत जाऊन प्रसार केल्यास पू. बांद्रे महाराज यांची भक्ती आणि ज्ञान साधकांंना समजू शकेल अन् तो अधिक परिणामकारक प्रसार होईल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले : भारतातील निरनिराळी राज्ये आणि विविध जिल्हे येथे आपले क्रियाशील साधक आहेत. बहुतेक सर्व जण या आश्रमात राहून शिकून गेले आहेत. महाराष्ट्रापासून आरंभ करू. तुम्ही एकदा महाराष्ट्रातील २-३ जिल्ह्यांतील चांगली माहिती असलेल्या एखाद्या साधकाच्या समवेत दौर्‍यावर जा. तालुका आणि राज्य येथील साधकांनी आपले (पू. बांद्रे महाराज यांचे) नाव दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचलेले असते. तुम्ही त्यांना भेटल्यावर ‘तुमची बोलण्याची पद्धत आणि ज्ञान किती आहे ? भक्ती किती आहे ?’, हे साधकांना कळेल. साधकांची आणि तुमची ओळख झाल्यावर पुढे तुम्ही सगळीकडे एकट्याने प्रसाराला जायचे आहे.

पू. सखाराम बांद्रे महाराज : माझी सद्गुरु सत्यवान कदम यांच्याशी ओळख झालीच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तसे निरनिराळ्या जिल्ह्यांत तुमची ओळख झाली की, मग पुढचे त्या त्या राज्यांतील सगळे दौरे तुमचेच असतील.

पू. सखाराम बांद्रे महाराज : मला आपले सगळे आश्रम बघायचे आहेत. साधकांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘प्रचारातला प्रत्यक्ष अनुभव कसा असतो ?’, ते २-३ मास पहा. मग आपले संत आहेत, त्यांच्या समवेत जा. ‘ते समाजाशी कसे बोलतात ?’, ते पहा. ‘संतांनी राष्ट्र-धर्म यांच्या संदर्भातही समाजाला कसे शिकवायचे आहे ?’, हे लक्षात येईल. सगळीकडे, जिल्ह्या-जिल्ह्यांत प्रचार व्हायला पाहिजे; कारण आता वेळ अत्यंत अल्प आहे. प्रथम सगळे महाराष्ट्र राज्यातील जिल्हे, नंतर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांतील शहरांत प्रचार करायचा. सभेमध्ये ‘हे आमचे वक्ते आहेत’, अशी तुमची ओळख करून दिली, तरी इतरांवर तेवढा परिणाम होणार नाही. तुमचे बोलणे प्रत्यक्ष ऐकले की, मग सगळ्यांवर परिणाम होईल. इतके तुमचे वक्तृत्व आणि विचारसरणी चांगली आहे. हे सगळे लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आपल्याला १-२ वर्षांत हे सगळे करायचे आहे. लक्षात आले ना ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी शेणक्यातील (शेणाच्या ढिगातील) बेडूक होतो. त्या बेडकाने कधी समुद्र बघितलेला नसतो. मी शेणक्यालाच समुद्र समजत होतो. आज आपण (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला या शेणाच्या ढिगातून बाहेर काढलेत आणि समुद्र (संस्थेचे व्यापक कार्य) दाखवलात.

२६. सनातनच्या साधकांना ‘सिद्धी म्हणजे काय ?’, हे ठाऊक नसतांना ते चांगला प्रचार आणि साधना करतात ! – परात्पर गुरु डॉ. आठवले 

पू. सखाराम बांद्रे महाराज : तुम्हाला माझ्यामध्ये असलेली एक कमतरता दिसते का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : काय ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : मला वाचासिद्धी नाही, म्हणजे मी सांगितलेले कुणी ऐकत नाही. त्या बाबतीत मी भिकारी आहे. मला भविष्यकाळातील किंवा ‘पुढे काय होणार ?’, हे काही दिसत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. मलाही दिसत नाही.

पू. सखाराम बांद्रे महाराज : कसे नाही ? तुम्हाला दिसते. ‘३-४ वर्षांपूर्वीच ‘जगामध्ये आपत्काळ येत आहे’, असे कुणी सांगितले ? मी बघत आहे. आता तुम्ही सांगितले, तसेच होत आहे. मला तसे कळत नाही. मला त्रिकालज्ञान नाही आणि वाचासिद्धीही नाही. ‘यासाठी मी काय करू ?’, ते सांगा भगवंता !

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण स्वभावदोषांविषयी बोलतोय ना ? त्यामुळेच सगळे होते. सगळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले; भावभक्ती वाढली, अगदी पराकोटीची भक्ती झाली की, मग या सगळ्या सिद्धी आपोआप प्राप्त होतात. तुम्ही आता म्हणालात ना, मला सिद्धी नाही. आमच्या साधकांकडेही सिद्धी कुठे आहेत ? ‘त्यांना अशा सिद्धी आहेत’, हेही ठाऊक नाही; पण ते ठिकठिकाणी प्रचार चांगला करतात.

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी डोंबिवलीला असतांना प्रियांकाताई (कु. प्रियांका लोटलीकर) माझ्या घरी येऊन गेली आहे. तेव्हा ती लहान होती. आता ती आकाशात पोचली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तिचीही प्रगती चांगली चालू आहे. ती विविध विषयांवर सुंदर लेख लिहू शकते. तिची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे. लवकरच ती संत होणार आहे. इतकी ती साधनेत पुढे गेली आहे. आश्रमात राहून आणि सगळे शिकून तिने ते कृतीत आणले; म्हणून ती पुढे गेली. ती किती लहान वयाची आहे ? समाजात प्रचार करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील काही गुण अत्यावश्यक आहेत. आपले कार्य आध्यात्मिक स्तरावर चालते. आपल्याला शारीरिक बळाची आवश्यकता नसते. देव सगळे करतच असतो. मानसिक स्तरावरील स्वभावदोष आणि अहं गेले की…

पू. सखाराम बांद्रे महाराज : मग तो देव झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही, म्हणजे तो सगळ्यांना प्रिय झाला. त्यामुळे सर्व जण आपले ऐकायला लागतात. ते सगळ्यात महत्त्वाचे असते. आमच्या सगळ्या साधकांमध्ये कुठल्याही संस्थेच्या साधकांपेक्षा साधकत्व अधिक आहे. ते साधना करतात; म्हणून आपोआप यश मिळते. तसे तुम्ही आता १-२ मासांत शिकून घ्या. इतरांना ५-१० वर्षे लागतात. तुम्हाला २ मासही पुरेसे आहेत. साधनेविषयी आम्ही अधिक सांगू शकतो. राष्ट्र आणि धर्म यांविषयी बोलायला आमचे साधक सिद्ध होऊन आता देश-विदेशात गेले आहेत. आश्रमात राहिल्यावर आणखी पटकन शिकता येईल. आता युद्धकाळ जवळ येत आहे. पूर्वी शिकण्यासाठी साधक आमच्याकडे १-२ वर्षे रहायचे; पण आता तसा वेळ नाही. काही मासांत तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्यायला हवेे आणि पुढे काही मास त्यांच्या समवेत जाऊन इतरांना राष्ट्र अणि धर्म यांच्या मार्गाला लावायला पाहिजे. आता हिंदु राष्ट्राची स्थापना आणि तीही केवळ भारतातच नाही, जगभरात करायची आहे.

पू. सखाराम बांद्रे महाराज : हो. संपूर्ण जगामध्ये !

२७. जगभर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, म्हणजे मानवजातीचेच कल्याण ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण हिंदु धर्मात कसे झाले आहे ? बरेच संत कीर्तनात म्हणतात, ‘देव, देश अन् धर्मासाठी…’; पण ते काय करतात ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : बोलायला पैसे लागत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पण यांच्या बोलण्याला पैसे लागतात हो ! निरनिराळ्या देशांत साधक सिद्ध होत आहेत. समाजातील सर्व संतांकडे जाऊन त्यांनाही राष्ट्र आणि धर्म यांविषयी सांगायचे आहे.

पू. सखाराम बांद्रे महाराज : सगळे चांगले होणार.

परात्पर गुरु डॉ. आठवले : जगभर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, म्हणजे मानवजातीचेच कल्याण आहे. आपल्याला दुसरे काय पाहिजे ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : आपल्याला लिहायचे वेड लागले. मलाही तेच वेड लागले आहे. दोघांना सारखेच वेड आहे; पण माझी क्षमता अल्प आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण म्हणूनच आपण एकत्र आलो ना ? ज्या सगळ्यांना साधनेचे वेड लागले आहे, तेवढे आपले साधक झाले आणि ते सगळे साधनेत पुढे चालले आहेत. तेच संत झाले, ६० टक्क्यांच्या पुढे गेले. त्यांना आता पुनर्जन्म नाही आणि काय पाहिजे ?

२८. पू. बांद्रे महाराज यांनी कर्तेपण देवाचरणी अर्पण करणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : इतके ज्ञान ईश्‍वराने पूर्वीच जमा केले आहे. हे सर्व तुमचेच आहे. माझे काय आहे याच्यात ? ‘इदं न मम ।’ म्हणजे ‘हे माझे नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही माझ्या इतका आत्मविश्‍वास मनात निर्माण केलात.

पू. सखाराम बांद्रे महाराज : त्यात माझे काही नाही. ‘इदं न मम ।’

परात्पर गुरु डॉ. आठवले : मग मीही म्हणतो, ‘इदं न मम ।’

(समाप्त)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक रूपात दर्शन होणे आणि त्या वेळी ‘ते साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे

सौ. वनिता शिवराम बांद्रे

‘मी साधनेत आल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्रच पाहिले होते. आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तेव्हा अनेक साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात अनुभूती यायच्या किंवा स्वप्नदृष्टांत व्हायचा; परंतु मला कधीही अनुभूती आल्या नव्हत्या. एकदा रात्री मला स्वप्नात दिसले की, मी साधकांच्या समवेत धर्मरथावर सेवेसाठी गेले आहे आणि आम्ही तिथे ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांचे वितरण करत आहोत. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले मला पूर्ण धर्मरथ भरून, म्हणजे व्यापक रूपात दिसले. ‘ते हात वर करून साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून मी साधकांना म्हटले, ‘‘थांबा, थांबा. धर्मरथातून बाबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) येत आहेत.’’ सकाळी जाग आल्यावर ‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले’, याचा मला पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. वनिता शिवराम बांद्रे, सावर्डे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (मार्च २०१०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.