निवळी (ता. चिपळूण) येथील पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे. (पूज्य सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला आहे.)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/509505.html
१५. भगवंताशी एकरूप होण्याची क्षमता असलेल्यास भगवंत त्याचे प्रारब्ध भोगण्यास लावून भोग संपल्यावर त्याच्याशी एकरूप होतो !
परात्पर गुरु डॉ. आठवले : हां. आता मला कळले. स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा अशा तीन इच्छा असतात. तुमची स्वेच्छा संपली आहे. हे सगळे वरवरचे नाटक चालले आहे. आहे कि नाही बरोबर ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : बरोबर आहे. मला पुन्हा जन्माला यायची इच्छा नाही; कारण मी हे सगळे बालपणापासून बघितले आहे. मी भकास, उदास आणि भयानक जीवन बघितले आहे. हे त्रास ज्याला पिडतात, सतावतात आणि जगणे नको करतात, अशाच घरामध्ये ईश्वर येतो. तो गादीवर लोळणार्यांकडे (श्रीमंतांच्या घरी) कधी येत नाही. गादीवर लोळणार्याकडे देव आल्याचे दाखवा पाहू.
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे ? एकदा परत सांगा.
पू. सखाराम बांद्रे महाराज : ईश्वर ज्याला संकटामध्ये टाकतो, भयंकर दुःख देतो आणि निखार्यांवर चालवतो त्याच्याकडेच तो येतो अन् त्याच्याशीच बोलतो. तो श्रीमंतांच्या घरी येत नाही. मी साधकांनाही सांगितले आहे. ‘आठवलेंवर किती संकटे येत आहेत ?’, ते तुम्ही बघितलेत का ? (परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींची किती आक्रमणे होतात, ते बघितले का ?) एखादे संकट तुमच्यावर आले, तर ‘आय, ओय’ काय करता ? (त्रासाशी न लढता गार्हाणे कशाला करता ?) आधी भक्तीमध्ये कुणी येऊ नका आणि आलात, तर अर्ध्यावरून पळून जाऊ नका. नाहीतर लंगोटी आहे, तीपण रहाणार नाही’. हे मी सनातनच्या साधकांना सांगितले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे बाप रे ! असे सांगितलेत तुम्ही !
१६. संसाराच्या मायेत अडकल्यामुळे कुणालाही त्यातून बाहेर पडावेसे न वाटणे
पू. सखाराम बांद्रे महाराज : संत तुकाराम महाराज म्हणतात,
चाले हे शरीर कुणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीविण ।।
देखवी ऐकवी एक नारायण। तयाचे भजन चुकवू नये ।।
– तुकाराम गाथा, अभंग ३९४८, ओवी १ आणि २
अर्थ : हे शरीर कुणाच्या सत्तेने चालते ? हे बोलवून घेणारा, दाखवणारा, ऐकवणारा त्या नारायणाविना दुसरा कोण आहे ? त्यामुळे त्याचे भजन कधीही चुकवू नये.
आपुला तो एक देव करूनी घ्यावा । तेणेवीण जीवा सुख नोहे ।
– संत तुकाराम महाराज
अर्थ : एका देवालाच आपलेसे करून घ्यावे; कारण त्याची प्राप्ती हेच जिवाचे खरे सुख आहे.
१७. ‘रामनाथी आश्रमामध्ये उच्च लोकांत असल्यासारखे वाटते !’ – पू. बांद्रे महाराज
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी इथे (रामनाथी आश्रमात) सगळे प्रत्यक्ष पाहिले. ते पाहून मला वाटले, ‘मी वरतीच (स्वर्ग आणि वैकुंठ येथे) आहे !’ घरात ५ माणसे असली, तरी ती एकमेकांशी भांडत रहातात. टॉवरमध्येही (सुशिक्षित वर्ग रहात असणार्या इमारतींमध्येही) तसेच असते; पण इथे २५० साधक गुण्यागोविंदाने एकत्र रहातात. स्वयंपाकघरातही आवाज नाही किंवा कुठेही खरकटे पडलेले दिसले नाही. मी अर्धा भारत फिरून आलो, अनेक तीर्थयात्रा केल्या; पण मला असे कुठेच पहायला मिळाले नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. आता आपल्याला जगभर असेच, म्हणजे सत्ययुगात होते, तसे करायचे आहे.
पू. सखाराम बांद्रे महाराज : ते होणारच आहे. शंभर टक्के होणार आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता मला काळजी नाही. मला असा आशीर्वाद द्या.
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी केवळ एकच सांगतो,
‘बद्रीनाथ, केदारनाथ देखा, काशी देखा, मथुरा देखा, देखी द्वारका ।
परंतु आठवलेजी के रामनाथी आश्रम जैसा कहीं नहीं देखा ।
और जिसने रामनाथी आश्रम नहीं देखा, उसने भारत में कुछ भी नहीं देखा ।’
१८. ‘इथे साधना शिकून सिद्ध झालेले साधक संपूर्ण जगभरात जातील आणि तिकडे अध्यात्माचा प्रचार करतील’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण आपला रामनाथी हा एकच आश्रम नाही. संस्थेचे असेच आश्रम आणि अनेक ठिकाणी आश्रमाप्रमाणेच असणारी सेवाकेंद्रे आहेत. यांना ‘संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे कुठे आहेत ?’, ती नावे सांगा.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : बर्याच ठिकाणी आहेत. मिरज आणि देवद (तालुका पनवेल) येथे आश्रम आहेत अन् सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, काशी (वाराणसी), देहली, भाग्यनगर, बेंगळुरू, मंगळुरू, केरळ अशी अनेक ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत.
पू. सखाराम बांद्रे महाराज : काशीलाही आहे ?
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : हो. काशी येथे, म्हणजे वाराणसी येथेही संस्थेचे सेवाकेंद्र आहे.
पू. सखाराम बांद्रे महाराज : उत्तर भारतात गंगेच्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. तिथेही आश्रम आहे ?
श्री. शिवराम बांद्रे : कुठेही बघायला गेलात, तर आपली अशी (रामनाथी आश्रमाप्रमाणे) सेवाकेंद्रे आहेत.
पू. सखाराम बांद्रे महाराज : कुडाळ सेवाकेंद्र पाहून आलो. बाकीचे आम्ही पाहिले नाही.
१९. विविध देशांत प्रसारकार्य वाढल्याने विदेशातही अनेक साधक असून पुढे सगळीकडे हिंदु धर्मच असणार आहे !
पू. सखाराम बांद्रे महाराज : अमेरिकन लोक चमच्याने खातात. एकच चमचा कितीतरी जणांच्या तोंडात जातो. आपल्या हिंदुस्थानात कसे होते ? पूर्वी मुंबईतील कुटुंबे हॉटेलमध्ये खाण्यासाठी जात नसत. केवळ नोकरचाकर किंवा ज्यांचे कुटुंबीय समवेत नाहीत, तेच हॉटेलमध्ये खायला किंवा जेवायला जायचे. आज ‘होटलमें खाना, घरमें हगना और रुग्णालयमें मरना ।’, म्हणजे मेल्यावर घरातील पाणीही पाजू शकत नाही. जीवन कसे झाले आहे ? हे चांगले आहे का ? याला सुशिक्षित म्हणतात का ? आम्ही सुधारलो कि बिघडलो ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही हेच बोलणे गावोगावी सांगितले पाहिजे. तुमच्यामुळे सगळे जागृत होतील.
परात्पर गुरु डॉ. आठवले : भारतात संस्थेचे इतके कार्य आहे. तसेच विदेशातील जिज्ञासू रामनाथी आश्रमात साधना शिकायला येतात. इथे शिकून सिद्ध झाले की, ते त्यांच्या देशात साधनेचा प्रसार करतात. अनेक देशांत आपले साधक आहेत. पुढे जगभर प्रसारकार्य होईल. काही देशांत २-४ साधक, काही देशांत १० – १५ साधक आहेत. ज्या देशांत ३० – ४० साधक होतील, त्यांना आश्रमाचे आणि एकत्र राहून साधना करण्याचे महत्त्व कळते. पुढे सगळीकडे हिंदु धर्मच असणार आहे !
पू. सखाराम बांद्रे महाराज : सनातन संस्थेचे १७ भाषांमध्ये ग्रंथ असल्याचे समजले. तेव्हाच मी समजलो होतो. माणूस एवढे कार्य करू शकत नाही. हे देवाचेच कार्य आहे. मी आत गुहेमध्ये शिरतोय. (मला ज्ञात नसलेले सगळे समजत आहे.)
२०. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरच आहेत’, असा भाव असणारे पू. बांद्रे महाराज !
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी आश्रमातील हे जे काही बघून जातोय, म्हणजे इतकी स्वच्छता, टापटीपपणा आणि बागेमध्ये असल्याप्रमाणे सगळे हसतांना दिसणे, गुलाबाच्या फुलासारखी तेजःपुंज मुलेबाळे आणि म्हातारे, ते मी आयुष्यात कधी पाहिले नाही. एवढी प्रगती किती वर्षांत केलीत ? तुम्ही सुदर्शनचक्रधारी, गदाधारी, पद्मधारी, शंखधारी नारायणच आहात; म्हणून एवढे सगळे शक्य होत आहे. मी आज तुमचे नावच पालटून जात आहे. आपल्यामध्ये (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये) प्रचंड शक्ती आहे. आपण ईश्वरच आहात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मला तुमच्यासारखे बोलायला आणि लिहायला शिकवा. मला असे तुमच्यासारखे बोलता येत नाही.
पू. सखाराम बांद्रे महाराज : देवाला मी कसे काय शिकवणार ? देवच माझी लेखणी, देवच माझा हात, देवच माझे डोळे आहेत. माझ्या माध्यमातूनही सगळे तुम्हीच करत आहात. मी काही करत नाही. सगळी शक्ती तुमचीच आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी काय बोलणार ? देव बोलतो ! तरी तुम्ही देवाला सांगता, ‘मी हे करणार नाही, ते करणार नाही.’ हे काय ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी आता तुम्ही सांगाल, तेच ऐकायला आलो आहे. ‘काय काय करू ?’, ते सांगा.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमची आधीची सगळी वाक्ये कशी होती ? आता मी काही करणार नाही.
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी कंटाळलो होतो. एकटाच राहून आणि सर्व कामे करून कंटाळलो होतो.
२१. ‘प्रवचनाच्या विषयांत पालट करून रामनाथी आश्रमात शिकायला मिळालेली सूत्रे सांगणार आहे’, असे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे
श्री. शिवराम बांद्रे : आता पू. महाराज म्हणतात की, मी रामनाथीला जेवढे सगळे बघितले आहे, तेवढे मी सगळे प्रवचनात सांगणार.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. तेच महत्त्वाचे आहे.
पू. सखाराम बांद्रे महाराज : आता मी प्रवचनांत पालट करणार आहे. आता ते महाभारत, रामायण इत्यादी सगळे सांगून झाले. आता हेच (आश्रम आणि संस्थेचे कार्य) सांगणे चालू करणार आहे. जी काही प्रवचने येतात, तिथे मी ‘येथील टापटीपपणा, प्रेम इत्यादीविषयी सांगणार आहे. मला मगाशी वाटले, ‘सर्वपक्षीय शासनकर्त्यांना सांगायचे, ‘देहलीपासून इथेपर्यंत सगळे खासदार आणि आमदार आहेत, त्यांना इथे फुकट घेऊन या. गाडीचे पैसे आम्ही देतो. केवळ हा आश्रम बघून जा. काही बोलू नका. भाषण करू नका. शासनकर्त्यांना इथे बोलावले, तर बरे होईल. काहींनी दारूची दुकाने आणि ‘डान्सबार’ उघडले आहेत. त्यांची बुद्धी सडली आहे. दारू पिऊन लाखो जण रात्रंदिवस काय करत आहेत ? महाराष्ट्र शूर, वीर आणि साधू-संत यांचा देश होता. आता यांनी त्याचे काय केले आहे ? दारू प्यायल्यामुळे भारताच्या भावी पिढीचा सत्यानाश होत आहे. खरंच आज छत्रपती शिवाजी महाराज असते ना, तर त्यांनी यांचा रायगडावरून कडेलोट केला असता ! ते कडेलोट करण्याच्या लायकीचेच आहेत. मी हे लिहिणार आहे. ते मला काय करणार ? पकडून नेतील ना ? मला पकडून नेले, तरी मी तुरुंगामध्येही पूजा करीन. मी सत्य बोलत रहाणार आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मला जे बोलायचे आहे, तेच तुम्ही सगळे बोलत आहात. त्यामुळे माझी सगळी काळजी मिटली. तुमच्या रूपात देवच पुढचे सगळे करायला आला आहे.
२२. सनातन धर्माचा प्रसार करणे, हीच आता तुमची (पू. महाराजांची) पूजा असेल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
पू. सखाराम बांद्रे महाराज : माझ्याकडून सगळे नारायणच करवून घेत आहे. वाचा त्याची, बोलणे त्याचे, लेखणी त्याची, हात त्याचे, सगळे तोच करवून घेत आहे. तो मला वरती बोलवेपर्यंत नारायण सांगेल, तसेच मी करणार आहे. माझे हे आपल्याला वचन आहे. मला केवळ घरकाम आणि पूजा यांतून सुटका मिळू दे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : सनातन धर्माचा प्रसार करणे, हीच आता तुमची पूजा असेल !
पू. सखाराम बांद्रे महाराज : मी बाहेर पडलो, तर मी तिथे (गावामध्ये) कुणाला नकोसा नाही. जवळच्या १०-२० गावांमधून मला नावे ठेवणारा एक तरी मनुष्य शोधून आणा. मी त्या व्यक्तीलाही भक्तीला लावल्याविना रहाणार नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांत सनातन संस्था, (परात्पर गुरु) डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती या सर्वांवरती भरपूर टीका असते.
पू. सखाराम बांद्रे महाराज : कुणी अन्यायकारक बोलले, तर मला ते सहन होत नाही. मी पेटून उठतो. माझ्यामध्ये स्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. वर्ष १९६८ ते १९७२ ही ४ वर्षे मी एका राजकीय पक्षामध्ये होतो. तो माझा स्वभाव अजून गेला नाही. मी धर्मसभेला जातो. तेव्हा गावात सनातन पंचांग (कॅलेंडर) वितरण करतो. एकदा पंचांग देत देत मी एका गावामध्ये गेलो. तेथे एका देवळाचा प्रमुख होता. तो मला म्हणाला, ‘‘हे मला नको.’’ मी त्याला म्हटले, ‘‘का ?’’ तो म्हणाला, ‘‘हे खुनी आहेत.’’ माझे डोके उठले (राग आला). मी म्हणालो, ‘‘यांनी कुणाचा खून केला ? तुझ्याकडे काय पुरावा आहे ? कुठल्या न्यायालयातून तुला पुरावा मिळाला ?’’ मग तो गप्प बसला.
( क्रमशः १३ सप्टेंबर या दिवशी )