रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते, त्या वेळी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद क्रमशः देत आहोत. (पूज्य सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला आहे.)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/509189.html

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (उजवीकडे) यांच्यातील भावभेटीचे संग्रहित छायाचित्र

१०. ‘देवाला सगळे येते, तसे तुम्हालाही सगळे येतच असणार’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी एकटाच जगतोय. शर्ट खाली पडला, तर घरात तो उचलायलाही कुणी नाही. घरातील स्त्रियांची आणि पुरुषांची कामे, मंदिरातील कामे, प्रवचन अन् प्रचार करणे, अशी सगळीच कामे मी एकटाच करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : देवाला सगळीच कामे येतात. मग तुम्हालाही येणारच ना ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी अष्टपैलू आहे. मला सगळी कामे येतात. कपडे धुणे, भांडी घासणे, घर आणि देवळाचा मोठा मंडप आहे, त्याचा केर काढणे, स्वयंपाक करणे, अशी सगळी स्त्री-पुरुषांची अखंड कामे मला करावी लागतात. पत्नीचे निधन झाले आणि भाऊ दुसर्‍या गावात रहातात.

परात्पर गुरु डॉ. आठवले (पू. महाराजांचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे यांना उद्देशून) : एक लक्षात ठेवा, ‘पू. बांद्रे महाराज काहीही ठरवू देत’; पण तुम्ही त्यांना देवळातील पूजनाच्या दायित्वातून मुक्त करा. (पू. बांद्रे महाराज यांना उद्देशून) तुमच्यात सर्वत्रच्या लोकांना साधनेकडे वळवण्याची क्षमता आहे. तुम्ही काय देवपूजा आणि घरातील कामांत अडकला आहात. आपल्याला आता तसे नको. (तेव्हा श्री. शिवराम बांद्रे ‘हो’ म्हणाले.)

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

११. ‘पिडा भोगणार्‍या लोकांमध्ये राहून त्यांना भोगांतून मुक्त करण्यासाठी आपण जन्म घ्यायचा’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : मला तुम्ही पुन्हा इकडे (पृथ्वीवर) आणू नका.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी तुम्हाला म्हणतो, ‘तुम्ही कायमचे इकडेच या आणि तुम्ही म्हणता… !’

पू. सखाराम बांद्रे महाराज : वर्ष १९६४ मध्ये मी शीवला (सायनला) मागणीप्रमाणे ‘प्लास्टिक बॅग’ वितरित करायला यायचो. सगळीकडे पायी फिरायचो. मुंबईमध्ये भाईंदरपासून कल्याण आणि विरारपर्यंत मी कुठल्याही गल्लीमध्ये किंवा मार्गावरून फिरायचो. मी गिरगावला फुटपाथवर रहात होतो. त्या वेळी मी पुष्कळ कष्ट केले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आम्हीही (आई-वडील आणि भावंडे) सगळे गिरगावलाच रहात होतो. आम्ही पहिल्यापासूनच एकत्रच रहात होतो.

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी सगळे त्रास बघितले आहेत. बालपणी पोटासाठी कष्ट करा. त्यानंतर तारुण्यातील कष्ट आणि आता म्हातारपण. ही पिडा भोगायची कशाला ? त्यामुळे मला मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्म घ्यायचा नाही. मला तुमच्याकडेच (देवाकडेच) ठेवा.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण अशी पिडा भोगणार्‍या लोकांमध्ये आपण जाऊन रहायचे आणि त्यांना भोगांतून मुक्त करायचे. मला तरी इकडे रहायला आवडते का ?

श्री. शिवराम बांद्रे

१२. ‘समाजातील वातावरण पंढरपूरसारखे सात्त्विक करणे, ही पांडुरंगाची सेवा असून यापेक्षा आणखी भाग्य कुठले ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : आज मी या परमेश्वराला विचारतो की, ‘तुला हा उद्योग (मनुष्याला जन्माला घालणे आणि त्याचा मृत्यू होणे) कुणी करायला सांगितला ?’ मी मरणाला घाबरत नाही. मी मंदिराच्या बाहेर माझ्यासाठी ४ फूट  Ñ ६ फूट आकाराचा खड्डा खणून ठेवला आहे. मृत्यूनंतर मला जाळायचे नाही. माझ्या मृत्यूनंतर एका घंट्याच्या आत मला खड्ड्यात टाका. तेव्हा मी म्हणेन, ‘आली दिवाळी आनंदाची. ही वाट द्वारकेची, पंढरीची आहे.’ हा आनंदाचा दिवस आहे. सगळे जगात आले, ते येतांना रडत आले. जातांना हसत चला ना ! आलो तिकडेच जाणार आहोत. दुसरीकडे कुठे जाणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण तुम्ही सगळीकडे पंढरपूरसारखे करणार आहात ना ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी काय म्हणतो, ‘देवाने हा उद्योग उघडलाच कशाला ? हे जग देवाला कुणी उभारायला सांगितले ? भगवंतालाच आम्हाला उजेड, वारा, पाणी द्यायचा किती त्रास झाला असेल ? त्याला पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश निर्माण करावे लागले. जगावर उजेड पाडण्यासाठी सूर्य-चंद्र निर्माण करावे लागले. त्यालाही त्रास झाला आणि आम्हाला ८४ लाख योनींच्या त्रासांमध्ये (जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये) अडकवले. नारायणा, मी तुझ्याशी भांडण करतोय. आम्हाला या पिडेमध्ये कशाला टाकले ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : अहो, ‘पांडुरंगाची सेवा करणे’, यापेक्षा आणखी भाग्य कुठले असते ?

१३. समाजाच्या मनात असणार्‍या ‘का आणि कसे ?’, या प्रश्नांची उत्तरे ज्ञानातून मिळवण्यासाठी पू. सखाराम बांद्रे महाराज यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : यात किती पिडा आहे ? भगवंताचे संकटे आणि दुःखाने भरलेले पेपर (प्रश्नपत्रिका) सोडवायचे. (प्रारब्धानुसार येणारी दुःखे आणि संकटे यांना सामोरे जायचे.) शाळा आणि महाविद्यालये यांमधील प्रश्नपत्रिका कागदावरील असतात; पण हे दुःख अन् पिडा यांनी भरलेले पेपर आयुष्यात सोडवायचे आहेत. मी कित्येक वर्षे हे पेपर सोडवत आहे. इतकी वर्षे मी त्यातील सगळे काटेकुटे अनुभवले आहेत. आपण पुण्य जमा करायला गेलो, तर देव आपल्याला निखार्‍यांवरून चालवतो; पण आपल्याकडे त्रास घेऊन येणार्‍याला आपण ते पुण्य विनामूल्य द्यायचे. तो (त्रास असणारा) चांगला होऊन जातो आणि तो देव अन् बुवा यांना विसरतो. नाही दिले (एखाद्याला त्रासातून मुक्त केले नाही), तरी तो (देव) मला खातो. त्यानंतर ८ दिवस झोपून रहायचे. (त्रास असणार्‍याला त्रासातून मुक्त केल्यामुळे स्वतःला त्रास होऊन झोपावे लागते.) हे देवाचे गणित काय आहे ? म्हणून मी देवाच्या समवेत भांडण करत आहे.

एक दुसरे सांगतो. देव माझी केवळ ४२ वर्षांची पत्नी घेऊन गेला. ती चांगली ज्ञानी होती, लक्ष्मी होती. ती गणेश मंदिरामध्ये घडली होती. ती नेहमी सप्ताहाला बसायची आणि ग्रंथ वाचायची. त्याने माझ्या पत्नीला कुठे नेले ? गाढव बनवले कि बेडूक बनवले ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता मला सुचले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नवीन ग्रंथ लिहायचे आहेत. मग सगळ्या समाजाला उत्तरे मिळतील. बरोबर आहे कि नाही ?

१४. भगवंताशी एकरूप व्हायचे असेल, तर पुढच्या टप्प्याची साधना करावी लागते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. सखाराम बांद्रे महाराज : परमेश्वराला मी विचारले, ‘मी मरणार कधी ? पूर्वजन्मामध्ये मी कुठल्या गावी होतो ?’ मी तुमच्याकडे पत्नी मागायला येणार नाही. तुम्ही मला ती देणारही नाही; पण तुम्ही बोलत का नाही ? मी विचारतोय, त्याची तुम्ही उत्तरे का देत नाही ? तुम्ही काहीही म्हणा; पण तो गोकुळचा कान्हा लबाड आहे. अजून त्याची लबाडी चालूच आहे. त्याने गवळणींना हैराण केले आणि आता मला हैराण करत आहे. तुम्हालाही हैराण करत आहे. करतो कि नाही ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : देव हैराण करत नाही. आनंद देतो. तो करतो, ते भल्यासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठीच असते.

पू. सखाराम बांद्रे महाराज : पण मला पुन्हा (पृथ्वीवर) यायचे नाही. नारायणा, मला आशीर्वाद पाहिजे. सगळ्यांना पापांतून मुक्त करायचे, हे फार कठीण काम आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण भगवंताशी एकरूप व्हायचे आहे ना ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : हो; पण माझ्यासारखे दुसरे गिर्‍हाईक शोधा ना !

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510053.html