दुखापतीमुळे निराश झालेल्या विकलांग भारतीय खेळाडूने श्रीमद्भगवद्गीता वाचल्याने मिळालेल्या उत्साहामुळे कांस्य पदक जिंकले !

टोकियो (जपान) येथील पॅरा ऑलिंपिकमधील घटना !

  • श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व न मानणारे बुद्धीप्रामाण्यावादी आता तोंड उघडतील का ? निराशेवर आधुनिक औषधोपचार करूनही बरे न होणारे आतातरी अध्यात्माचे महत्त्व जाणतील का ? – संपादक

  • हिंदु धर्मग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण करणेच हितावह ! – संपादक
भारतीय खेळाडू शरद कुमार पदकासमावेत

टोकियो (जपान) – येथे चालू असलेल्या ‘पॅरा ऑलिंपिक’मध्ये (विकलांगांसाठीच्या ऑलिंपिकमध्ये) भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यातच भारतीय खेळाडू शरद कुमार यांनी उंच उडीत कांस्य पदक पटकावले. याविषयी शरद कुमार यांनी सांगितले, ‘सरावाच्या वेळी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ‘अंतिम सामन्यात मला खेळता येईल का ?’ ‘मला पदक मिळेल का?’ असे विचार मला सतावत होते. अंतिम सामन्यातून माघार घेण्याचा मी विचार करत होतो. सामन्याच्या आदल्या रात्री मी रात्रभर रडलो. रात्री मी माझ्या कुटुंबियांशी बोललो. माझ्या वडिलांनी मला श्रीमद्भगवदगीता वाचण्यास सांगितली आणि ‘मी काय करू शकतो ?’, यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जे माझ्या हातात नाही, त्यावर लक्ष न देण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर मी श्रीमद्भगवदगीता वाचली. दुसर्‍या दिवशी अंतिम सामन्याच्या वेळी दुखापत विसरून मी उंच उडी मारण्यास सज्ज झालो. प्रत्येक उडी मारणे, हे माझ्यासाठी युद्धच होते. मला मिळालेले कांस्य पदक हे सुवर्ण पदकच आहे. शरद कुमार हे २ वर्षांचे असतांना त्यांना पोलिओचा बनावट डोस देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला पक्षघात झाला.