तामिळनाडू राज्य हे भव्य आणि प्राचीन हिंदु मंदिरांसाठी जगप्रसिद्ध आहे. दीड वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेटही महाबलीपूरम् येथील अशाच एका प्राचीन मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली होती. मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, कुंभकोणम् येथील आदि कुंभेश्वर मंदिर, तिरुवण्णामलई येथील अण्णामलई मंदिर अशा एकाहून एक शेकडो सुंदर आणि सात्त्विक मंदिरांचा प्राचीन वारसा या दक्षिण भारतीय राज्याला लाभलेला आहे. पल्लव आणि त्यांच्या आधीच्या वैभवशाली हिंदु राजसत्तांच्या काळात ही मंदिरे बांधली गेली. गेल्या १ सहस्र वर्षांत इस्लामी आक्रमकांनी उत्तर भारतात हैदोस घालून हिंदु धर्माचा नायनाट करण्याचा प्रयत्न चालवला. असे असले, तरी दक्षिण भारत मात्र बर्याच प्रमाणात म्लेंच्छांपासून सुरक्षित राहिले होते. आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे. तथ्यहीन ‘आर्य आक्रमण सिद्धांता’चा सर्वांत घातक उपयोग जर कुठे झाला असेल, तर तो तमिळनाडूत ! नास्तिकतावादालाही तेथे नेहमीच खतपाणी मिळत राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बहुतेक काळ तेथील राजकारण ‘हिंदुविरोध’ या एका सूत्राला केंद्रीय स्थानी धरून केले गेले. त्याचाच परिपाक म्हणजे तेथील मंदिरांवर वरचेवर होत असलेले आघात !
अतिक्रमणामागील राजकारण !
जुलैमध्ये उत्तर तमिळनाडूतील कोईम्बतूर शहराच्या महानगरपालिकेने शहरातील मुथानुकूलम् नावाच्या तलावाच्या सुशोभिकरणाचा कार्यक्रम हातात घेतला. शहरातील ९ मंदिरे ही तलावाच्या परिसरात कथित रूपाने अतिक्रमण करत बांधण्यात आली आहेत, असे सांगत ती पाडण्यात आली. यांत एका १०० वर्षे जुन्या मंदिराचाही समावेश आहे. या विरोधात हिंदु मुन्नानी (हिंदु आघाडीवर) आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्यावर हिंदुत्वनिष्ठांनाच अटक करण्यात आली. या घटनेची नोंद घेण्याइतपत त्याला ‘टी.आर्.पी.’ नसल्याने कोणत्याच राष्ट्रीय वृत्तवाहिनीने अथवा वर्तमानपत्राने एवढा ज्वलंत विषय हातात घेतला नाही. मंदिरे पाडण्यासाठीचे हे धाडस कधी कुणा दर्गा अथवा मशीद यांच्यासंदर्भात दिसत नाही. कोईम्बतूर शहरातील पेरिया कडई रस्त्याच्या मधोमधच एक मशीद उभारण्यात आली आहे. असेच चित्र देशातील जवळपास प्रत्येक शहरात पहायला मिळते. अशा मशिदी अथवा दर्गे यांना हात लावण्याचे तर दूरच; पण केवळ त्याविरोधात कारवाई करण्याचे सूतोवाच केले, तरी कशा आणि किती तीव्रतेच्या प्रतिक्रियेला सामोरे जावे लागेल, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. देहलीतील एका चर्चने अतिक्रमण केल्याने ते पाडण्यात आल्याची घटनाही गेल्या मासातील आहे; परंतु त्याविरोधात मात्र देश-विदेशांत आकांडतांडव झाला. दक्षिण तमिळनाडूत असलेल्या टेंकासी जिल्ह्यातील कडायम येथे चर्चने केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत त्याऐवजी चर्चच्या विरोधात आरोप करणार्या एका हिंदुत्वनिष्ठाच्या घराची संरक्षक भिंत पाडण्यात आली. या घटनेला अभावानेच कुठे प्रसिद्धी मिळाली. यातून राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते. हिंदूंच्या मवाळ आणि ‘अतीसहिष्णुता’ या सद्गुणविकृतीचाच हा परिणाम आहे, हे यातून लक्षात येते.
तमिळनाडूत मंदिरांवरील आघातांची अशीच एक घटना तिरुनेलवेली येथील मंदिरे असलेल्या पवित्र डोंगरावर घडली आहे. तेथे धर्मांधांनी ‘चांदतारा’ लिहिला आणि ‘७८६’ (इस्लाममधील पवित्र आकडा. या आकड्याचे स्मरण केल्यास कार्यामध्ये यश मिळते, अशी संबंधित पंथियांची श्रद्धा आहे.) हा आकडा, तसेच ‘अल्लाह’ शब्द लिहिल्याचे उघडकीस आले. काहीच दिवसांपूर्वीच काही समाजकंटकांनी राज्यातील रानीपेट जिल्ह्यातील कावेरीपक्कमजवळ असलेल्या पंचलिंगेश्वर मंदिरातील अम्मनदेवी आणि दुर्गादेवी यांच्या मूर्तींची नासधूस केली. समाजकंटकांनी दोन्ही देवींच्या मूर्तींना नेसवण्यात आलेली साडी काढून जाळली, तसेच तेथे हस्तमैथुन करत मूर्तींवर वीर्य पाडले. अशा सर्व घटना या हिंदूंच्या मंदिरांवरील भयावह आघात स्पष्ट करत आहेत. या घटनांना तेथील द्रमुक शासनच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कारणीभूत आहे. त्यामुळेच तेथील मंदिरांना वाली कोण ?, हा प्रश्न निर्माण होतो.
हिंदुद्वेषी अनास्था !
तमिळनाडूत गेल्या मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या आहेत. त्या कालावधीत मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांना सरकारीकरणापासून मुक्त करण्यासारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आले होते. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी ‘राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरांमध्ये पूजा होत नाही. तसेच ३४ सहस्र मंदिरांचे वार्षिक उत्पन्न १० सहस्रांहूनही अल्प आहे आणि ३७ सहस्र मंदिरांची देखभाल-दुरुस्ती, पूजा आणि व्यवस्थापन यांसाठी केवळ एकाच व्यक्तीची नेमणूक केली आहे’, अशी धक्कादायक माहिती समोर आणली होती. या माध्यमातून मंदिरांना सरकारीकरणापासून मुक्त करत त्यांना भक्तांच्या हातात देण्याच्या आग्रही मागणीने जोर धरला होता. यावर द्रमुक, अण्णा द्रमुक आणि त्यांचे घटक पक्ष यांनी निवळ राजकारण करत मंदिरांचे रक्षण अन् संवर्धन करण्याची आश्वासने दिली. त्यांच्या घोषणापत्रांत त्याचा प्राधान्याने उल्लेखही केला; पण स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने सत्तेवर येताच हिंदूंच्या मागणीला ठेंगा दाखवण्यास आरंभ केला आहे. तमिळनाडूत गेल्या काही दिवसांत घडलेल्या मंदिरांविरोधातील घटना पहाता ते स्पष्ट होत आहे. हिंदूंविषयीची ही राजकीय अनास्था ही हिंदूंना नेहमीच मारक राहिली आहे. यासाठी भारतभरातील हिंदूंनी संघटित होऊन मंदिरांवरील आघातांचा विषय सातत्याने लावून धरणे काळाची आवश्यकता आहे. अर्थात् हिंदु धर्माला राजाश्रय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठीच प्रयत्न करणे हा मंदिरांवरील आघातांवर एकमेव उपाय असल्याचे जाणा !