आपत्काळात राजकारण नको !

गेल्या ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील तळये गावात दरड कोसळल्याने ४२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण शहर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांची घरे आणि व्यापार्‍यांची दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतही महापुराने हाहा:कार उडाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, इतर मंत्री, तसेच विरोधी पक्षाचे नेते यांचे दौरे चालू आहेत आणि त्यावरून राजकारण चालू झाले आहे.

तळये येथील परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री (मध्यभागी)

सत्तेतील आणि सत्तेत नसणारे एकमेकांना ‘पूरग्रस्त भागात आवश्यकता नसतांना दौरे करू नयेत’, असे सांगतात; मात्र ‘स्वत:चे दौरे योग्य कसे आहेत ?’, हे ते पटवून सांगत आहेत. चिपळूण येथे एका महिलेचे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर ती महिला टाहो फोडून मुख्यमंत्र्यांना साहाय्य करण्याची मागणी करत होती. या वेळी एका आमदारांनी त्या महिलेशी अरेरावी केली म्हणून टीका करण्यात येत आहे, तर ते आमदार स्वतः योग्य कसे सांगत आहेत; मात्र त्या महिलेच्या साहाय्यासाठी कुणी धावून गेले नाही.

तळये येथील परिस्थितीची पाहणी करताना नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस

रायगड आणि सातारा या जिल्ह्यांत दरड कोसळल्यामुळे हानी झालेल्यांसाठी, तसेच सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी सरकारच्या वतीने साहाय्याच्या घोषणांचा पाऊस पडतो आहे. नेत्यांचे दौरे होतात आणि सांत्वनासह आश्वासने दिली जातात. दिवस सरतात आणि त्यातील बरीचशी आश्वासने हवेत विरली जातात, हा नित्याचाच अनुभव आहे. गेल्या २ वर्षांत राज्यात उद्भवलेला महापूर आणि चक्रीवादळ यांची झळ बसलेल्या लोकांपर्यंत हे साहाय्य अद्यापही पोचलेले नाही.

तळये गावात दरड कोसळून झालेली पडझड आणि नागरिक

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी अन्नधान्य, वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात प्रत्येक नागरिकाने साहाय्य केले पाहिजे. कोल्हापूरला आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना अनेक लोकप्रतिनिधींनी साहाय्य पाठवले आहे. यातून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन, तसेच राजकारण थांबवून लोकांना साहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई