नक्षत्रांचे देणे !

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. ‘जुलै मासात मुसळधार पाऊस होणार’, असे ‘महालक्ष्मी’ या पंचांगात आधीच लिहिले होते. नक्षत्रांवरून पावसाचा अंदाज वर्तवण्याचे अद्भुत शास्त्र प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात आहे. हे आपल्या पूर्वजांचे देणं आहे. भारतीय प्राचीन शास्त्र हे अत्यंत प्रगत असून ते समाजासाठी हितावह आहे. हे सत्य मात्र तथाकथित पुरोगामित्वाची झापडे लावलेले नाकारतात. वैज्ञानिक कसोटीच्या पोकळ गप्पा मारून या शास्त्राला विरोध करतात. काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम शिकवण्यास पुरो(अधो)गाम्यांनी विरोध केला होता. हे ज्ञान अशास्त्रीय असल्याचा द्वेषपूर्ण आणि अज्ञानमूलक दावा त्यांनी केला होता. ज्या ज्योतिषशास्त्राला विरोध झाला, त्यात ‘नक्षत्रे’ हा अविभाज्य भाग आहे; मात्र झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्‍याला कसे उठवणार ? याप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांसमोर कितीही सप्रमाण सिद्ध केले, तरी ते त्यांचा हेका सोडणार का ? हा प्रश्नच आहे.

आपल्याकडे पावसाचा अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. आतापर्यंतचे अनुभव पहाता हवामान खात्याची कार्यप्रणाली तकलादू असल्याचेच समोर आले आहे. या अंदाजांवर विसंबून संभाव्य हानी टाळता आली, असे अभावानेच घडले आहे. याउलट पावसासह निसर्गातील अन्य घडामोडींचा वेध घेण्याची प्राचीन भारतीय पद्धत पाहिल्यावर थक्क व्हायला होते. अचूक अंदाज कसे वर्तवावेत ? याचे यथार्थ ज्ञान या शास्त्रात आहे. मोगलांपासून इंग्रजांपर्यंत भारतीय तत्त्वज्ञान संपवण्याचा परकीय आक्रमकांनी आटोकाट प्रयत्न केला, तरीही आजही हे तत्त्वज्ञान काही प्रमाणात का होईना अस्तित्वात आहे. याला अभ्यास आणि संशोधन यांची जोड मिळून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. अभ्यासक्रमांत प्राचीन भारतीय शास्त्राचा समावेश करायला हवा. तसेच जे अभ्यासक या शास्त्रासाठी योगदान देत आहेत, त्यांचा उचित सन्मान करायला हवा. विरोध करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आवर घालायला हवा. राष्ट्रहितासाठी हे आवश्यक आहे !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.