रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे (दादा) यांनी स्वतःच्या सात्त्विक आचरणातून मुलांवर केलेले धार्मिकतेचे अन् साधनेचे संस्कार !
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
या लेखमालेत आज २२ जुलै २०२१ या दिवशी आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया !
‘पालकांना त्यांच्या पाल्यांना एखादी गोष्ट शिकवायची झाल्यास ती सांगावी लागते. त्यांना पाल्यांचा वारंवार पाठपुरावा घ्यावा लागतो. त्यांना प्रसंगी शिक्षापद्धतही अवलंबावी लागते; परंतु आमच्या आई-वडिलांची (म्हणजे पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी आणि कै. वामनराव जलतारे (दादा) यांची) आमच्यावर संस्कार करण्याची पद्धतच निराळी होती. ‘आम्ही एखादी गोष्ट करावी’, यासाठी ते दोघेही कधीही आग्रही नसत. ते स्वतः सर्व गोष्टी करत असत. त्यामुळे त्यांच्या कृतीतूनच आम्हाला काही गोष्टी आपोआप शिकायला मिळाल्या आणि त्यानुसार कृती करण्याची प्रेरणा मिळाली.
१. पू. आई आणि दादा यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. धार्मिक वृत्ती
१ अ १. पू. आई आणि दादा यांनी नियमितपणे सकाळी लवकर उठणे, कार्तिक अन् माघ या मासांत पहाटे लवकर उठून स्नान करणे आणि कार्तिक मासात मंदिरात जाऊन काकड आरती म्हणणे : पू. आई आणि कै. दादा सकाळी लवकर उठायचे. ‘ते उशिरापर्यंत झोपले आहेत’, असे कधीही झाले नाही. कार्तिक मासात पुष्कळ थंडी असतांनाही ते पहाटे लवकर उठून स्नान करून काकड आरती (देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी मंदिरात केली जाणारी आरती) करत. दादा जवळच्या मंदिरात जाऊन काकड आरती म्हणण्याची सेवा करायचे. त्यासाठी त्यांना पहाटे ३.३० – ४ वाजता उठावे लागायचे; परंतु त्यांनी त्यांच्या या नियोजनात कुठल्याही परिस्थितीत पालट केला नाही. ते प्रतिवर्षी पहाटे लवकर उठून माघस्नानही करत.
१ अ २. पू. आईंनी श्लोक आणि स्तोत्रे म्हणत अन् नामजप करत स्वयंपाक करणे आणि त्यांची अडचण असतांना दादांनी नैवेद्यासाठी सोवळ्यात स्वयंपाक करणे : पू. आई प्रतिदिन लवकर स्नानादी आवरून स्वयंपाक करायच्या. त्या स्वयंपाक करतांना अनेक श्लोक आणि स्तोत्रे म्हणत. त्या नामजप करत स्वयंपाक करायच्या. त्या चारही मुलांना (सौ. माया पिसोळकर, सौ. छाया देशपांडे, श्री. राजेश, अधिवक्ता योगेश जलतारे यांना) एकाच वेळी जेवायला बसवायच्या आणि गरम अन्न वाढायच्या. पू. आईंची अडचण (मासिक पाळी) असतांना किंवा तिला बरे नसतांना दादा स्वयंपाक करायचे. त्यांनी केलेले पदार्थही पुष्कळ चविष्ट असत. ते देवाच्या नैवेद्यासाठी सोवळ्यात स्वयंपाक करायचे.
१ अ ३. पू. आई आणि दादा यांनी धर्मग्रंथांचे वाचन करणे : पू. आई आणि दादा एक क्षणही वाया घालवत नसत. पू. आईंना घरकामातून फारच थोडा वेळ मिळत असे. त्यातही त्या शक्य तितके वाचन करायच्या. वडील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळेत भागवत, रामायण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुकारामाची गाथा, विष्णुसहस्रनाम इत्यादी ग्रंथांचे पारायण करत. ते जिज्ञासूंना या धर्मग्रंथांतील कितीतरी संदर्भ सहजतेने सांगायचे. इतके हे धर्मग्रंथ त्यांना मुखोद्गत झाले होते.
१ आ. दादांची परोपकारी वृत्ती !
आमच्या गावात नवरात्रात ठिकठिकाणी उत्सव असायचा. त्या वेळी देवीच्या ५ – ६ फुटांच्या मूर्ती बसवल्या जात. तेव्हा गावातील लोक देवीला सहावारी आणि नऊवारी साडी नेसवण्यासाठी दादांना बोलवत असत. दादांना बरीच पारपंरिक आयुर्वेदीय औषधे ठाऊक होती. ते लोकांना औषधे उपलब्ध करून देत. गावातील कुणाला पोटशूळ उठला (पोट दुखू लागले), तर ते रात्री-अपरात्री दादांना बोलवायला यायचे आणि दादाही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पोटावर तेल लावून पोट चोळून द्यायचे. त्यानंतर त्या लोकांना बरे वाटत असे. गावातील कुणाचे निधन झाल्यास दादांना त्याविषयी प्रथम सांगितले जायचे. त्यानंतर दादा त्यांच्याकडे जाऊन अंत्यसंस्काराची सर्व कर्मे निरपेक्षपणे करत. ते मयताच्या कुटुंबियांना धीर द्यायचे.
१ इ. दादा परंपरावादी असूनही आधुनिक विचारसरणीचे असणे
पू. आई आणि दादा यांचे रहाणीमान साधे होते. दादा आयुष्यभर धोतर, झब्बा आणि टोपी असा पोशाख घालत असत. ते कायम धर्मकार्यात व्यस्त असायचे. त्यामुळे तसे पहायला गेले, तर ते परंपरावादी होते. त्या काळच्या लोकांच्या दृष्टीकोनातून त्यांची विचारसरणी मागासलेली होती; मात्र ‘लोकांचा दादांकडे पहाण्याचा दृष्टीकोन अयोग्य होता’, हे आता आमच्या लक्षात येते; कारण दादांनी आम्हाला कधीही कुठल्याच क्षेत्रात मागे ठेवले नाही. त्या काळात सुशिक्षित पुरुषही मुलींना पुढे घेऊन जाण्यासाठी फारसे उत्सुक नसायचे; परंतु मी मुलगी असूनही दादा मला किराणा माल, तसेच भाजी आणणे आदी गोष्टींसाठी बाजारात घेऊन जायचे. त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी त्यांच्या भावांचा विरोध पत्करून शहराच्या ठिकाणी शिकायला पाठवले. ते मला लहान भावांना शाळेत पोचवायला आणि घरी घेऊन यायलाही सांगायचे. त्या काळी जातींमध्येही शाखाभेद पाळण्याचा प्रघात होता; परंतु दादांनी शाखाभेद झुगारून योग्य आणि धार्मिक संस्कारित कुटुंबांत आम्हा बहिणींचा विवाह लावून दिला.
त्यांच्या काळीही कामगार आणि मालक असा भेद होता. दादांची शेतातील सर्व कामगारांशी जवळीक होती. शेतावर कापूस वेचणार्या स्त्रिया दादांना मोठा भाऊ मानत. दादाही त्यांना भाऊबिजेला ओवाळणी देत. त्यामुळे सख्खी आत्या नसली, तरी अशा प्रकारे जोडलेल्या अनेक आत्या आम्हाला होत्या. त्या पू. आईंवर नणंदेचा अधिकारही गाजवायच्या. पू. आई आणि दादा यांचे त्याविषयी काही गार्हाणे नसायचे.
२. पू. आई आणि दादा यांनी मुलांवर केलेले संस्कार
२ अ. पू. आई आणि दादा यांनी मुलांना स्वावलंबी बनवणे
पू. आई आणि दादा यांनी आम्हाला लहानपणापासूनच जेवणाची भांडी घासायला अन् कपडे धुवायला शिकवले. पू. आई स्वयंपाक झाल्यावर शेवटच्या २ – ३ पोळ्या आम्हाला करायला सांगायच्या. आम्ही लहानपणीच पोळ्या करायला शिकलो. दादांनी आम्हाला शाळेत प्रवेश घेण्यापर्यंतच साहाय्य केले. त्यानंतर त्यांनी आमच्या शाळेकडे किंवा अभ्यासाकडे कधीच लक्ष दिले नाही. ‘शाळेचे विविध अर्ज भरणे, महाविद्यालयात गेल्यावर शाखा निवडणे, प्रतिवर्षी प्रवेश अर्ज भरणे आणि प्रवेश घेणे’ इत्यादी गोष्टी ते आम्हालाच करायला सांगायचे. ते केवळ ‘प्रवेश शुल्क भरणे आणि अर्जावर सही करणे’, या दोन गोष्टी करायचे. त्यामुळे आम्हाला स्वावलंबी होता आले. ‘आम्हाला शिकवण्याची अन् स्वावलंबी बनवण्याची ती त्यांची पद्धत होती’, हे आता आमच्या लक्षात येते.
२ आ. पू. आई आणि दादा यांनी मुलांना ‘अतिथि देवो भव ।’ (म्हणजे अतिथीला देवाप्रमाणे मानावे)’, ही शिकवण देणे
२ आ १. पू. आईंनी घरी आलेल्या प्रत्येकालाच पोटभर खाऊ घालणे : ‘आमच्या दारातून कधीही आणि कुठल्याही वेळी आलेला भिक्षेकरी विन्मुख परत गेला’, असे झाले नाही. पू. आई त्यांना गरम पदार्थ वाढायची. एकदा एका भिक्षेकर्याला सर्दी झाली असतांना पू. आईंनी त्यांना गरम कढी करून प्यायला दिली होती. त्यांनी आमच्यावर लहानपणापासूनच घरी आलेल्या प्रत्येकालाच पोटभर खाऊ घालण्याचा संस्कार केला.
२ आ २. पू. आईंनी शेजारच्या कुटुंबाला अडचणीच्या वेळी शिधा उपलब्ध करून देणे : आमच्या शेजारी रहाणार्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आमच्याप्रमाणे जेमतेमच होती. त्यांच्या घरातील तेल, पीठ, दूध इत्यादी काही संपले, तर ते आमच्याकडे मागायला येत. तेव्हा पू. आई लगेचच त्यांना ते उपलब्ध करून देत असत.
२ आ ३. दादांनी शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या मुलांना घरी केलेले खाद्यपदार्थ देणे : काही वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आमच्या घरी जेवायला येत. आजूबाजूच्या खेड्यांतून मुले शिक्षणासाठी आमच्या गावी येत. तेव्हा ती मुले त्यांच्या आई-वडिलांपासून लांब रहातात; म्हणून दादा त्यांना आमच्या घरी केलेले खाद्यपदार्थ, लोणचे, चटणी इत्यादी नेऊन देत असत. त्या मुलांनाही दादांचा आधार वाटत असे.
२ आ ४. पू. आईंनी मुलांना गावातील श्रीमंत लोकांकडे सप्तशतीचा पाठ करायला आलेल्या ब्राह्मणांची सेवा करायला सांगणे : नवरात्रात बाहेरगावचे एक ब्राह्मण गावातील श्रीमंत लोकांकडे येऊन सप्तशतीचा पाठ करायचे. ते नवरात्रातील दहाही दिवस आमच्याकडे रहायला असत. त्या वेळी त्यांच्या जेवण्या-खाण्याची आणि कपडे धुण्याची सर्व व्यवस्था पू. आई करायच्या. आम्हाला रात्री त्या ब्राह्मणांची पाठ आणि पाय चेपून देणे इत्यादी सेवाही कराव्या लागायच्या. यांतूनच त्यांनी आम्हाला सेवेचे बाळकडू पाजले.
२ इ. पू. आई आणि दादा यांनी मुलांवर धार्मिकतेचे संस्कार करणे
२ इ १. दादांनी मुलांना देवपूजा आणि व्रतवैकल्ये करायला शिकवणे : दादा आरंभी स्वतः देवपूजा करायचे. आम्ही थोडे मोठे झाल्यावर त्यांनी आम्हाला पूजा करायला शिकवले. ते विविध नित्य-नैमित्तिक व्रतवैकल्ये करत. ते प्रतिमास पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करायचे. त्यांनी माझ्या भावांकडून ती सेवा १० वर्षे करवून घेतली.
२ इ २. पू. आई आणि दादा यांनी मुलांना मंदिरात भजने म्हणायला घेऊन जाणे अन् त्यांना मंदिरात सेवेसाठी पाठवणे : पू. आई आणि दादा शेजारच्या मंदिरांत भजने म्हणण्यासाठी जायचे. त्या वेळी ते आम्हाला समवेत घेऊन जात. ते दोघेही भावपूर्णरित्या भजने म्हणत. त्यामुळे आम्हा भावंडांनाही भजनांची आवड निर्माण झाली. मंदिरांमध्ये भंडारा किंवा वार्षिक धार्मिक उत्सव असतांना ते आम्हाला तेथे सेवेसाठी पाठवत. आम्ही रहात असलेल्या वाड्यात असलेल्या श्री नृसिंह मंदिरातील वार्षिक उत्सवात तेथील पितळ्याची उपकरणे (पूजेसाठी वापरण्यात येणारी भांडी) घासण्याची सेवा करण्याची संधी त्या काळात आम्हाला आई-दादांमुळे मिळाली.
२ इ ३. पू. आई आणि दादा यांनी मुलांना मंदिरातील भागवत सप्ताह, लळित अन् भारूड इत्यादी कार्यक्रमांच्या वेळी समवेत नेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करणे : पू. आई प्रतिवर्षी भागवत सप्ताहासाठी मंदिरात जात असत. मंदिरात जाण्यापूर्वी त्यांची जागा निश्चित करण्यासाठी त्या आम्हाला त्यांचे आसन मंदिरात ठेवायला सांगत असत. ही कृती लहानशीच होती. त्या स्वतःही ते आसन समवेत नेऊ शकल्या असत्या; परंतु या माध्यमातून त्यांनी आमच्यावर नकळत धार्मिकतेचे संस्कार केले. मंदिरातील भागवत सप्ताहाच्या वेळी ज्या दिवशी कृष्णलीला सांगितली जाणार असायची, त्या दिवशी पू. आई आम्हाला आवर्जून मंदिरात घेऊन जात. त्या वेळी कुणीतरी कृष्णाचे रूप घेऊन भागवतात सहभागी होत असे. ते पहायला चांगले वाटत असे. त्या आम्हाला मंदिरात चालणारे लळित (‘लळित’ हा एक पारंपरिक मराठी नाट्यप्रकार आहे. नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश करतात.’ – संकलक), भारूड (‘भारूड’ हा मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांतून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य केले जाते.’ – संकलक) इत्यादी कार्यक्रमांनाही नेत. या कार्यक्रमांत रोचकता असायची आणि आमच्यावर चांगले संस्कारही व्हायचे.
२ इ ४. पू. आईंनी ‘पत्रद्वारे दासबोधा’ची परीक्षा देतांना मुलाकडून पत्रे लिहून घेणे आणि त्यातून त्याचा दासबोधाचा अभ्यास होणे : पू. आईंनी ‘पत्रद्वारा दासबोध’ या उपक्रमाच्या अंतर्गत दासबोधाच्या विविध परीक्षा दिल्या. त्या वेळी त्यांनी माझ्या भावाचे (राजेशचे) अक्षर सुवाच्च असल्याने त्याच्याकडून पत्रे लिहून घेतली. त्यामुळे लहान वयातच राजेशवर धार्मिकतेचे संस्कार झाले. त्याच्याकडून पत्र लिहिण्याच्या निमित्ताने दासबोधाचा अभ्यास झाला.
२ ई. पू. आईंनी मुलांच्या मनावर संघटितपणाचे महत्त्व बिंबवणे
आमचे रहाते घर एका मोठ्या वाड्यामध्ये होते. तेथे ५ – ६ कुटुंबे रहात होती. या सर्व कुटुंबांत एकी होती. उन्हाळ्याच्या दिवसांत एकत्र येऊन ‘पापड आणि शेवया करणे अन् विविध प्रकारची लोणची बनवणे’, असे या कुटुंबांतील स्त्रिया एकत्रितरित्या करायच्या. पू. आई आम्हाला त्यांत सहभागी करून घ्यायच्या. त्यामुळे आम्हाला एक वेगळा आनंद अनुभवायला मिळायचा. चातुर्मासात प्रत्येकच दिवशी एक व्रत असते. त्या व्रताची कथा सामूहिकरित्या श्रवण केली जायची. ती कथा वाचण्याची सेवा आम्हाला दिली जायची. यातूनही आमच्यावर संघटितपणाचे आणि धार्मिकतेचे संस्कार झाले.
२. उ. दादांनी आचारधर्माचे तंतोतंत पालन करणे आणि मुलांकडूनही ते करवून घेणे
घरची परिस्थिती बेताची असल्याने घरी पंखा, ‘गॅस’ शेगडी, धुलाई यंत्र (वॉशिंग मशिन), ‘मिक्सर’ (वाटणयंत्र), दूरचित्रवाणी संच इत्यादी गोष्टी घेणे आम्हाला परवडणारे नव्हते. त्यामुळे ‘हाताने कपडे धुणे, पाटा-वरवंटा वापरणे, चुलीवर स्वयंपाक करणे’, असे सर्व असायचे. आम्हाला घरही नेहमी शेणाने सारवावे लागायचे. आमचे याविषयी अधूनमधून गार्हाणे असायचे. घरी गुळाचा चहा केला जायचा. घरी कधी पाहुणे आल्यासच आम्हाला साखरेचा चहा प्यायला मिळायचा. दादा या गोष्टी पालटण्यात फारसे उत्साही नव्हते. त्यांना या गोष्टी मागितल्या, तर ते काही ना काही कारण सांगून टाळायचे. त्यामुळे ‘शेजारी रहाणारे लोक आधुनिक होत आहेत आणि आपण कुठेतरी मागासलेले आहोत’, ही भावना कुठेतरी उफाळून यायची. दादांनी कदाचित् मनात आणले असते, तर या गोष्टी ते लीलया जमवू शकले असते; परंतु ‘ते त्यांनी त्या वेळी का केले नाही ?’, हे मला आता कळते. आज प्रथितयश आधुनिक वैद्यही साखरेऐवजी गूळ खायला सांगतात. चुलीवरील स्वयंपाकाचाही आता ‘उदो उदो’ होत आहे. आगामी आपत्काळात वीज उपलब्ध होणार नसल्याने यंत्रे चालणार नाहीत. त्यामुळे पाटा-वरवंटा, जाते, चूल इत्यादी वस्तू वापरण्याविषयी जनप्रबोधन होत आहे. आपण दूरचित्रवाणी संच आणि अन्य करमणुकीची साधने यांचे दुष्परिणाम पहात आहोत. दादांनी आम्हाला या सर्वांपासून मोठ्या कुशलतेने दूर ठेवले. त्यामुळे आज आमचे आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत आहे.
२ ऊ. पू. आई आणि दादा यांनी पूर्वीपासून विविध नामजपादी उपाय करणे अन् मुलांनाही तशी शिकवण देणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आपल्याला आज नामजपादी अनेक उपाय शिकायला मिळत आहेत. ‘दादा हे नामजपादी उपाय तेव्हाही करायचे’, हे आता मला आठवते, उदा. अभिमंत्रित जल प्यायला देणे, ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवणे, तेथे विशिष्ट दिवशी कापूर आणि उदबत्ती लावणे, घरात नित्यनेमाने कडूनिंबाच्या पाल्याची धुरी करणे, उदबत्तीने वास्तूशुद्धी करणे इत्यादी. ‘सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडू नये. केस मोकळे सोडू नयेत. केसांची टोके बांधावीत’, असे ते आम्हाला सांगायचे. ते प्रतिदिन स्नानापूर्वी शरिराला तेल लावायचे. त्या वेळी त्यांची शरिराला तेल लावण्याची पद्धतही शास्त्रीय होती. पू. आई प्रतिदिन कितीही उशीर झाला, तरी रात्री रामरक्षा म्हणून आम्हा सर्व भावंडांना विभूती लावूनच झोपायची.’
– सौ. माया श्रीकांत पिसोळकर (थोरली मुलगी), फोंडा, गोवा. (१६.७.२०२१)
सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !
‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे. लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected] पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१ |