२० व्या शतकातील सर्वांत महान वैज्ञानिक म्हणून लौकिक असलेले अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी भारतीय ऋषिमुनींच्या विज्ञानासाठीच्या अभूतपूर्व योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आईन्स्टाईन म्हणतात, ‘आम्ही भारतियांचे अत्यंत ऋणी आहोत. त्यांनी आम्हाला गणती करायला शिकवले; कारण त्या व्यतिरिक्त कोणताही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध लावता येत नाही.’ फ्रान्सचे महान तत्त्वचिंतक व्होल्टेअर यांच्या मते, ‘पायथागोरस हे महान गणितज्ञ २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी ग्रीसच्या समोस येथून गंगेकाठी भूमितीचे ज्ञान घेण्यासाठी आले होते.’ १९ व्या शतकात ‘क्वांटम फिजिक्स’ (भौतिकशास्त्र) मध्ये महत्त्वपूर्ण शोध लावलेले नील्स बोर यांना उपनिषदांतून स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे मिळत असत.
यांसारख्या असंख्य वैज्ञानिकांनी संशोधनातील आपल्या अग्रणी कार्यासाठी भारत आणि हिंदु धर्म यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे वेळोवेळी नमूद करून ठेवलेले आहे. त्यांचे नशीब बलवत्तर की, ते आजच्या युगात नाहीत अन्यथा अमेरिकेची विश्वविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला ज्या प्रकारे विरोधाला तोंड द्यावे लागत आहे, तसे या वैज्ञानिकांनाही ‘बुरसटलेल्या विचारसरणी’चे, ‘हिंदु वर्चस्ववादी’, ‘प्रतिगामी’, ‘संघी’ आदी नानाविध शाब्दिक टीकेला सामोरे जावे लागले असते. नुकतेच ‘नासा’ने एक ट्वीट केल्याने ती पुरो(अधो)गाम्यांच्या टीकेचे धनी बनली आहे. अत्यंत बुद्धीमान असलेल्या तरुणांना नासामध्ये ‘इंटर्नशिप’ (प्रशिक्षण) करण्यास उद्युक्त करण्यासाठी या संस्थेने ट्वीट करतांना आधीच्या ‘इंटर्न्स’ची छायाचित्रे जोडली आहेत. यांत प्रतिमा रॉय या हिंदु तरुणीचे छायाचित्रही असून तिच्या पटलावर विविध हिंदु देवतांच्या मूर्ती आणि चित्रे असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. त्यामुळे पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आदींचा गट अस्वस्थ झाला आहे. ‘नासा विज्ञान नष्ट करू पहात आहे’, येथपर्यंत काही उपटसुंभांना साक्षात्कार झाल्याचे पहायला मिळत आहे. विज्ञानाच्या कक्षेपलीकडील जगताचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या संत-महात्म्यांना विरोध करण्यामागील बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे दुखणे आपण समजू शकतो; परंतु आपल्या कर्तृत्वाने जगाचा कायापालट करण्यात अग्रणी असलेल्या संस्थांपैकी एक असलेल्या नासाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाणे, हा जिज्ञासूवृत्तीने अभ्यास करणार्या एखाद्या पाश्चात्त्य विज्ञानवाद्यालाही मूर्खपणा वाटेल. म्हणजे विरोध करतांना आपल्यासमोर कोण आहे ? याचा ताळमेळही हिंदु विरोधकांना उरलेला दिसत नाही. या पुरोगामी गटाने वेळोवेळी जगासमोर आपल्या बुद्धीच्या दिवाळखोरीचे दर्शन घडवलेले आहे; परंतु आता त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी नासाचे उदाहरण पुरेसे आहे.
‘प्रकाश’ वर्ष !
नासाने केलेल्या शोधांची गणती नाही. २०० इतका बुद्ध्यांक असलेले आणि मानवी इतिहासातील सर्वांत बुद्धीमान व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिद्ध अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत तर सोडाच; पण ‘इंटरस्टेलार’ सारखा हल्लीचा एखादा हॉलिवूड चित्रपट तरी या उपटसुंभांना समजेल का, हे देवालाच ठाऊक ! ब्रह्मांडातील अंतर हे ‘प्रकाश वर्षां’त मोजले जाते. प्रकाशाची गती ही बुद्धीच्या पलीकडील आहे. एका सेकंदात ३ लाख किलोमीटर इतक्या अफाट गतीने एखादी व्यक्ती (जे कदापि शक्य नाही) एक संपूर्ण वर्ष धावली, तर ती जेवढे अंतर कापेल, त्यास ‘१ प्रकाश वर्ष’ म्हणता येईल. आपला सूर्य पृथ्वीपासून साधारण ८ प्रकाश मिनिटे दूर आहे, तर केवळ आपल्याच ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाण्यासाठी २ लक्ष प्रकाशवर्षे लागतात. अशा अनंत कोटी आकाशगंगा या ब्रह्मांडात आहेत. ‘ब्लॅक होल’चा विषय तर वेगळाच ! १ प्रकाश वर्ष म्हणजे ९४,००,००,००,००,००० किलोमीटर. यातील शून्य मोजायचे कसे ? याविषयीही या बुद्धीमान्यांना वेगळे प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यातूनतरी त्यांच्या डोक्यात कितपत ‘प्रकाश’ पडेल, हे सांगता येणे तसे कठीणच !
वर्ष २००८ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या पुरो(अधो)गाम्यांच्या समजल्या जाणार्या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार ‘नासा’मध्ये तब्बल ३६ टक्के वैज्ञानिक हे भारतीय आहेत. त्यांपैकी किती जण हे देवाधर्माला मानतात, याविषयी निश्चितच एखादे सर्वेक्षण व्हायला हवे, असे या निमित्ताने प्रकर्षाने वाटते. दुसरीकडे जगात स्वतःची नेत्रदीपक यशस्वीता सिद्ध केलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चे अनेक वैज्ञानिक हे श्रद्धाळू आहेत. कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या या वैज्ञानिकांनाही भगवंताचा आधार घ्यावासा वाटतो. इस्रोकडून कोणतेही मोठे उड्डाण करण्याआधी ते तिरुपती बालाजीला साकडे घालतात. त्यांचे अध्यक्ष व्यंकटेशाचे दर्शन घेऊन येतात. वर्ष २०१९ मध्ये डेविड कोहेन निर्मित आणि राधा भारद्वाज दिग्दर्शित ‘स्पेस मॉम्स’ नावाच्या ‘इस्रोने वर्ष २०१४ मध्ये केलेले मंगळग्रहावरील यशस्वी उड्डाण’ या विषयावर काढलेल्या चित्रपटातही ‘अंतराळातील प्रवास हा भारतियांच्या डीएन्एमध्ये (मूळ वृत्तीत) आहे’, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. एवढेच कशाला, नासासमवेत ज्या प्रतिमा रॉय या तरुणीची टीका केली जात आहे, तिनेही ‘माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जे करतो, ते देव पहातच असतो’, असे म्हणत देवावर आपली श्रद्धा असल्याचे स्पष्ट केले आहे.
नासाला उपरती !
असे असले, तरी ‘नासा’पण काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही बरं ! जानेवारी २०१५ मध्ये ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’कडून आयोजित कार्यक्रमात आनंद बोडस नावाच्या प्राध्यापकाने ‘सांप्रतकाळी विमानाचा शोध हा राईट बंधूंनी नव्हे, तर शिवकर बापूजी तळपदे यांनी लावला, तसेच विमान बनवण्याची विद्या आपल्या पुराणांत उल्लेखित आहे’, असे म्हटले होते. त्यावर नासानेच टीका करत त्यास ‘स्युडो सायन्स’ (छद्म विज्ञान) म्हणून लाखोली वाहीली होती. आता मात्र याच नासाला उपरती झाली असून ती ‘हिंदु’ भारतियांना स्वीकारत आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची पहाट जसजशी समीप येत आहे, तसतशी किंबहुना त्या दिशेने त्याची जागतिक स्तरावरील चिन्हे दिसू लागली आहेत. आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !