पुणे ग्रामीण भागात सातत्याने अवैधरित्या गोवंशियांची हत्या करण्यात येत आहे. याविषयी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीही करण्यात आल्या आहेत; पण त्यावर विशेष काही कारवाई होतांना दिसून येत नाही. त्यामुळे बजरंग दलाच्या वतीने गोवंश हत्याबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यात नुकतीच निदर्शने करण्यात आली. गायीचे महत्त्व विशद करतांना रामचरित्मानसमध्ये म्हटले आहे, ‘भूकंप कहे गाइ की गाथा । कांपे धरा त्रास अति जाता ।। जा दिन धरा धेनु न होई । रसा रसातल ता छन होई ।।’ याचा अर्थ ‘भूकंप गायीची गाथा गातो. जेव्हा गोमातेला त्रास होतो, तेव्हाच पृथ्वी कंपित होते. ज्या दिवशी या पृथ्वीवर गाय नसेल, तेव्हा पृथ्वी पाताळात जाईल.’
वेदांनी हिंदूंच्या ५ सांस्कृतिक मानबिंदूंत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. गायीमुळे पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी होते. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी होते. दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच येईल. औषधांचे उत्पादन करणार्या ‘सॅब बायोथेराप्युटिक्स’ या अमेरिकेतील आस्थापनाने ‘गायीच्या शरिरातील ‘अँटीबॉडीज’ (रोगप्रतिकारक शक्ती) कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरू शकेल’, असा दावा केला आहे.
गोहत्येमुळे देशाची अर्थव्यवस्था केंद्रीभूत असलेले कृषीक्षेत्र ओसाड होत असून देशातील जनतेचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जगातील सर्वांत मोठे ॲमेझॉनचे जंगल सलग काही मास जळत होते. याविषयी प्रसिद्ध अभिनेते लिओनार्डो डिकॅप्रियो यांनी ‘मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असल्याने अशा भीषण आगी लागत आहेत’, असे मत व्यक्त केले होते. गोवंश हत्येचानिसर्गावर एवढा परिणाम होत असेल, तर गोपालनाचा लाभ किती असेल ? हे सरकारने लक्षात घेऊन प्रथम गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वांत अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे