गोवंश हत्याबंदी कायदा असतांना अशा प्रकारचे निवेदन द्यावे लागणे दुर्दैवी ! प्रशासन स्वतःहून प्रभावी कार्यवाही का करत नाही ? प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच कायदा करूनही त्याचा जनतेला लाभ होत नाही, हे चिंताजनक आहे.
नंदुरबार, ११ जुलै (वार्ता.) – नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांतून नर्मदा नदी अन् वाहन यांद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध गोतस्करी चालते. गोतस्कर हे गोवंश हत्येसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह मालेगाव, मुंबई येथे वाहतूक करतात. या गोवंशियांची अवैध वाहतूक आणि हत्या थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन गोरक्षकांच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना १० जुलै या दिवशी देण्यात आले.
या निवेदनावर हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य अधिवक्ता रोहन गिरासे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अजय कासार, गोरक्षक श्री. भूषण पाटील, श्री. खुशाल भोई, धर्मसेवक श्री. मयुर चौधरी, श्री. सुमित परदेशी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दिग्विजय ठाकरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
१. गोरक्षक आणि गोसेवक वेळोवेळी हत्येसाठी घेऊन जाणार्या अवैध वाहतुकीच्या विरोधात आवाज उठवतात. त्या वेळी प्रशासन तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करते. त्यामुळे यावर पायबंद बसत नाही. प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने गोरक्षकांना त्यांचा जीव धोक्यात घालून गोवंशियांना वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो.
२. ७ जुलै या दिवशी नंदुरबार ते विसरवाडी या मार्गावर अवैध गोवंशियांची वाहतूक करणार्या ट्रकचा पाठलाग करतांना गाडी पकडली जाऊ नये; म्हणून आणि गोरक्षकांचा अपघात होण्यासाठी गोतस्कर ट्रकमधून लाल मिरची पावडर गोरक्षकांवर फेकत होते.
३. नंदुरबार जिल्ह्यात या आठवड्यात गोरक्षकांची सतर्कता आणि पोलीस प्रशासनाला दिलेली माहिती यांमुळे ४ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
४. तरी २१ जुलै या दिवशी असलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने अवैध गोवंश वाहतूक आणि त्यांची हत्या होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, तसेच जिल्ह्यात कायमस्वरूपी पडताळणी नाके निर्माण करावेत.
५. नंदुरबार शहरात कसाई मोहल्यात गोवंशीय हत्येसाठी बांधलेले असतात आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर हत्या करून ग्रामीण भागात अन्य तालुक्यांमध्ये गोमांस निर्यात केले जाते. त्यावर कडक कारवाई करावी.
६. गोवंश पकडल्यावर गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी.