१. देवळांतील उत्सव भावपूर्ण पद्धतीने पार पडले पाहिजेत !
‘देवळांत होणारे उत्सव किंवा देवाच्या जत्रा या देवतेच्या चैतन्याचा एक आनंदोत्सव न बनता गैरप्रकारांचे एक ठिकाण बनलेले आहे. देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
२. उत्सवांना विकृत स्वरूप दिल्यास देवतेच्या चैतन्याचा र्हास होणे
भावपूर्ण पद्धतीने उत्सव साजरे केले नाहीत, तर देवतेच्या सात्त्विकतेचा भाविकांना लाभ होत नाही. हिंदूंनी उत्सवांना किंवा जत्रांना दिलेल्या विकृत, तसेच बाजारूपणाच्या प्रदर्शनामुळे देवतेच्या चैतन्याचा र्हास होऊन त्याचे पातक समष्टीला लागते.
३. उत्सवाच्या वेळी फटाके उडवणे निषिद्ध
उत्सवाच्या वेळी फटाके उडवतात, यामुळे सत्त्वलहरींचे विभाजन होऊन त्यांची कार्य करण्याची क्षमता अल्प होते, शिवाय या वायूप्रदूषणात माणसालाही जर तेथे थांबणे अशक्य होते, तर अत्यंत सूक्ष्म असणार्या देवतांचे तत्त्व तेथे कसे थांबेल ?
४. मोठ्यांदा लावलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेतील आवाजामुळे चैतन्यकणांचे विभाजन होणे
मोठ्यांदा लावलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेतील आवाजामुळे चैतन्यकणांचे विभाजन होऊन त्यांचे अखंडत्व नष्ट झाल्याने वातावरणात त्रासदायक स्पंदने खेचली जातात.
५. पुजार्यांनी म्हटलेल्या बेसूर, तसेच मोठ्या आवाजातील मंत्रातून विकृत मंत्रशक्ती निर्माण होणे
काही देवळांतील पुजारी मोठ्यांदा, तसेच स्पर्धा लावल्यासारखे चढाओढीने बेसूर आवाजात मंत्र म्हणतात. या मंत्रातील एकही अक्षर दुसर्यांना कळत नाही. अशा पद्धतीने म्हटलेल्या मंत्रशक्तीमुळे वातावरणावर विपरित परिणाम होतो; कारण यातून निर्माण होणार्या त्रासदायक स्पंदनांच्या प्रभावाने मंत्रशक्ती विकृत स्वरूप धारण करते, त्यामुळे याचा भाविकांना लाभ होण्याऐवजी त्यांच्या देहावर आणि मनावर याचे विकृत परिणाम होतात.
६. गडबडीने मंत्र म्हणून पूजाविधी गुंडाळून ठेवणार्यांना हिंदूंनी जाब विचारावा आणि त्यांना दक्षिणा देऊ नये !
कोणताही मंत्र योग्य पद्धतीने, नम्रतेने, तसेच भावपूर्ण स्वरांत म्हटल्यासच तो सिद्ध होतो, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. असे अशुद्ध मंत्र म्हणणार्यांना, तसेच मंत्रशक्तीचा अपमान करणार्यांना, तसेच पूजाविधी गडबडीत गुंडाळणार्यांना हिंदूंनी दक्षिणा देऊ नये, याचा त्यांना जाबही विचारावा. पुजार्यांच्या हातूनच मंत्रशक्तीचा अपमान होणे, ही गोष्ट हिंदु धर्माला अत्यंत लाजिरवाणी आहे. असे केल्याने पूजास्थळी देवता येत नाहीत.
७. विकृत धर्माचरणामुळे देवळाचे महत्त्व न्यून होणे
अशा अनेक प्रकारच्या दुष्कृत्यातून देवळाची चैतन्याच्या स्तरावर कार्य करण्याची क्षमता अल्प होत गेल्याने त्या त्या देवळाचे महत्त्व कालमहात्म्याप्रमाणे अल्प होत जाते.
८. देवळाच्या बाहेरचा बाजार हटवून तेथे धर्मशिक्षण देणारे फलक लावले पाहिजेत !
देवळाच्या बाहेर भरणारा बाजार हटवून तेथे शांतता राहील, अशा पद्धतीनेच तेथील वातावरण सिद्ध केले पाहिजे. तेथे सर्वत्र सुवचने आणि धर्मशास्त्र शिकवणारे अन् यातून भाविकांना धर्मशिक्षण देणारे फलक लावले पाहिजेत. त्यामुळे ते सात्त्विक मनाने दर्शन घ्यायला देवळात प्रवेश करतात.
९. देवळात ध्वनीक्षेपकावरून त्या त्या देवतेचा नामजप लावून ठेवणे आवश्यक !
देवळात ध्वनीक्षेपकावरून त्या त्या देवतेचा नामजप लावला पाहिजे, तरच तेथे येणार्या भाविकांच्या मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन मन अंतर्मुख होऊन देवतेप्रती भाव जागृत होण्यास साहाय्य होते.
१०. अनावश्यक गप्पा मारत बसणार्या मंडळींना तेथे बसण्यास मज्जाव करणे
देवळाच्या आवारात किंवा देवळात बसून व्यवहारातील अनावश्यक गप्पा मारत बसणार्या वृद्ध, तसेच मध्यमवर्गीय मंडळींना, सांसारिक गप्पा मारणार्या बायकांना तेथे बसण्यास मज्जाव करून केवळ ध्यानाला बसणार्या मंडळींनाच तेथे बसण्यास देवस्थान समितीने अनुमती दिली पाहिजे, नाहीतर देवस्थान समितीच्या अधिकाराचा काय उपयोग ?
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.