‘प.पू. भक्तराज महाराजांची भजने  त्यांचे भावार्थ’, हा साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा ! – डॉ. जयंत बाळाजी आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)

गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणारा सनातनचा ग्रंथ ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’

प.पू. भक्तराज महाराज यांचा आज ७ जुलै २०२१ या दिवशी जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज

गुरुपौर्णिमेच्या (२३ जुलै २०२१ या) दिवशी सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे मुलुंड (मुंबई) येथील भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी केले आहे. या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज ७ जुलै २०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे मनोगत आणि एका भजनाचा सारांश येथे देत आहोत.

१. प.पू. भक्तराज महाराज विरचित भजनांचे अलौकिकत्व !

शिष्य डॉ. आठवले

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणायचे, ‘भजन हेच माझे जीवन आहे !’ प.पू. बाबांची गुरुसेवेची आत्यंतिक तळमळ, त्यांचा गुरूंविषयीचा अपार भाव, त्यांची अध्यात्मातील शिकवण इत्यादी सारे त्यांच्या भजनांमधून व्यक्त होते.

प.पू. बाबांसारख्या उच्च कोटीच्या संतांनी भजने रचली असल्याने ती पुष्कळ चैतन्यदायी आहेत. त्यामुळे या भजनांद्वारे साधक आणि भक्त यांना विविध स्तरांवरील अनुभूतीही येतात. म्हणूनच प.पू. बाबांची भजने म्हणजे, एक अलौकिक, आनंददायी आणि चिरंतन असा ठेवा आहे.

२. कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांच्याकडून प्रस्तुत ग्रंथमालिकेच्या संबंधाने घडलेली अमूल्य गुरुसेवा !

कै. चंद्रकांत दळवी

साक्षात् परब्रह्मस्वरूप असलेल्या प.पू. बाबांचा सहवास त्यांच्या काही भक्तांना जवळून लाभला. अशाच भक्तांपैकी एक भक्त म्हणजे, कै. चंद्रकांत रामकृष्ण दळवी (दादा दळवी). दादांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची प्रकृती ही भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा सुंदर संगमच होती. दादांनी प.पू. बाबांना वेळोवेळी प्रश्न विचारून किंवा प.पू. बाबांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या विवेचनातून भजनांचे भावार्थ नीट समजून घेतले. दादांनी भावार्थांच्या आशयामध्ये स्वतःच्या लिखाणाची भर घालून, ते सूत्रबद्ध करून, सुगम अन् ओघवत्या भाषेत लिहिले. प.पू. बाबांनी बहुतांशी भजने ही त्यांच्या तत्कालीन मनोदशेला अनुसरून लिहिली आहेत. ती मनोदशा समजून घेतली, तर भजनांचा अर्थ उकलणे सोपे होते. दादांनी बर्‍याच भजनांच्या ठिकाणी प.पू. बाबांची तत्कालीन मनोदशा वर्णन केलेली असल्याने त्या भजनांचा अर्थ समजणे सोपे झाले आहे. दादांनी काही भजनांच्या ठिकाणी विषयाला समर्पक असे अध्यात्मावर विवेचनही केले आहे. त्यामुळे भजनातील विषय कळायला आणखी साहाय्य झाले आहे. अशा प्रकारे ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि त्यांचा भावार्थ’ यांची ग्रंथमालिका सिद्ध झाली असून प्रस्तुत ग्रंथ हा या मालिकेतील पहिला ग्रंथ आहे.

सर्व साधक आणि भक्त यांना प.पू. बाबांच्या भजनांचे भावार्थ कळावेत, या तळमळीपोटी दादांनी केलेली ही केवढी मोठी गुरुसेवा आहे ! या सेवेवरून दादांची अध्यात्मातील प्रगल्भता आणि साधनेतील प्रगतीही लक्षात येते.

३. कृतज्ञता

दादांमुळेच भजनांच्या भावार्थांचा हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. यासाठी मी सर्व साधक आणि भक्त यांच्या वतीने दादांप्रती मनोमन कृतज्ञता व्यक्त करतो. दादांच्या कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी दादांनी केलेले भावार्थांचे लिखाण आम्हाला देऊन ‘ते ग्रंथस्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या सेवेची संधी दिली’, यासाठी त्यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करतो.

४. प.पू. बाबांच्या चरणी ग्रंथ अर्पण !

‘प.पू. बाबांच्या कृपेमुळेच आम्हा भक्तांकडून या ग्रंथाच्या निर्मितीचे कार्य पूर्ण होऊ शकले’, याविषयी प.पू. बाबांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण करतो.’

– डॉ. जयंत बाळाजी आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)

श्रीधरा माधवा हरि वंदितो तुला ।

१४ जुलै १९५६

श्रीधरा माधवा हरि वंदितो तुला । वंदितो तुला ।
हे विघ्नहरा प्रभु शारंगधरा गोपाळा ।। १ ।।

मती दे मज श्री गुरुचरण सेवेसी । चरण सेवेसी ।
पुरवावी तुवा ही । गाढ आस दिनाची ।। २ ।।

लागो झळा कोमल सुकुमारा । (टीप) कोमल सुकुमारा ।
मनी लागे आस ही परमार्थाची ।।
धाव पाव मुकुंदा शक्ती दे त्याची ।। ३ ।।

ही तहान-भूक ना राहे । अचल चित्त राहे ।
अचल चित्त राहे ।
गुरुवाचूनी दुसरे दैवत जगी ना हे ।। ४ ।।

साष्टांग नमन साईचरणाला । साईचरणाला ।
या दिना बुद्धी दे तव चरणी भजनाला ।। ५ ।।

टीप – ‘झळा’ म्हणजे भक्तीची झळ आणि ‘सुकुमारा’ म्हणजे लहानांना. थोडक्यात, लहान वयातच भक्तीची आवड निर्माण होऊ दे.

भजनाचा सारांश : देवाला किंवा गुरूंना प्रार्थना करण्याचे महत्त्व अपरंपार आहे. प.पू. बाबा भजनांचा (भजनांच्या कार्यक्रमाचा) प्रारंभ ‘प्रार्थना’ हा भाव प्रगट होणार्‍या वरील भजनाने करत असत. प.पू. बाबा श्री गुरूंमध्येच प्रत्येक देवतेचे रूप पहात असत. त्यामुळे त्यांनी या भजनात ‘श्रीधर, माधव, हरि, शारंगधर, गोपाळ’ इत्यादी विविध नावांद्वारे गुरूंनाच आर्तभावाने आळवले आहे. त्यांनी या भजनातून ‘गुरुसेवा करण्याची बुद्धी द्यावी आणि परमार्थाचा म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास लागावा’, अशा प्रार्थना केल्या आहेत.

(अन्य भजनांचा भावार्थ क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.)