सू कॅरोबू या कॅनडातील ५० वर्षीय महिला. त्या लहान असतांना म्हणजे वर्ष १९७२ मध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी त्यांना स्वतःच्या कह्यात घेऊन चर्चने चालवलेल्या ‘इंडियन रेसिडेंशियल स्कूल’मध्ये भरती केले. तेथे त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार यांची जी शृंखला चालू झाली, त्याचे दूरगामी परिणाम त्या आजही भोगत आहेत. ख्रिस्ती मिशनर्यांनी त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना रात्री-अपरात्री थंड पाण्याने अंघोळ करण्यास भाग पाडले. यासह सतत मारहाण करणे, निकृष्ट दर्जाचे जेवण देणे, शारीरिक कामे करण्यास बाध्य करणे, हे नित्याचे झाले होते. कॅरोबू यांच्यावर वर्ष १९७९ पर्यंत हे अत्याचार चालू राहिले. त्यांचा गुन्हा एकच, त्या ख्रिस्ती नव्हत्या, तर मूळ निवासी होत्या. सू कॅरोबू यांच्याप्रमाणे ७०च्या दशकात १ लाख ५० सहस्र मूळ निवासी मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करून त्यांना चर्चप्रणीत ख्रिस्ती शाळांमध्ये डांबण्यात आले. स्वतःची संस्कृती, भाषा आणि परंपरा यांची नाळ तोडून त्यांना ख्रिस्ती बनवण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्यांनी रचलेले हे षड्यंत्र होते. यात अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. या घटनांना उजळणी देण्याचे कारण म्हणजे कॅनडातील कॅमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूलच्या परिसरात २१५ लहान मुलांचे मृतदेह भूमीत पुरण्यात आल्याचा उघडकीस आलेला प्रकार. एका माहितीनुसार सुमारे ६ सहस्र मुले या अत्याचारांमुळे बळी पडली. ही आकडेवारीही खरी नाही; कारण खरी आकडेवारी लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उघड झाल्यानंतर कॅनडातील वातावरण ढवळून निघाले. या घटनेनंतर कॅनडात बाहेरून स्थायिक झालेल्या लोकांनी (म्हणजेच ख्रिस्त्यांनी) मूळ निवासींवर केलेल्या अत्याचारांना पुन्हा वाचा फुटली आहे. या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मूळ निवासींची क्षमा मागितली आहे; मात्र यामुळे मूळ निवासी नागरिक समाधानी नाहीत. ‘या प्रकरणी पोप फ्रान्सिस यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी या प्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘मी कॅनडातील मूळ निवासी नागरिकांचे नेतृत्व करणार्या लोकांची भेट घेणार’, असे वक्तव्य केले आहे; मात्र क्षमा मागण्याविषयी अजून वक्तव्य केलेले नाही. त्यांनी क्षमा मागितली, तर त्यातून काय निष्पन्न होणार आहे ? जगभरातील चर्चचे ‘प्रताप’ बाहेर पडत असून काही प्रकरणांत पोप यांनी क्षमा मागितली आहे; मात्र पुढे काय ? कॅनडात मूळ निवासींवर होत असलेला अन्याय अजूनही थांबलेला नाही. तेथील महिलांवर आजही अत्याचार होत आहेत आणि मूळ निवासींना आजही दुजाभावाची वागणूक मिळत आहे. या प्रकरणामुळे ‘ख्रिस्ती सभ्यते’ची विकृत आणि पाशवी मनोवृत्ती यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. ‘आकाशातील बापा’च्या लेकरांच्या धर्मांध कारवायांमुळे जगाचे मनःस्वास्थ्य बिघडत आहे, हे निश्चित !
ख्रिस्तीकरणाचे अघोरी प्रकार !
कॅनडातील मूळ निवासींमध्ये ‘फर्स्ट नेशन्स’, ‘मेतिस’ आदी विविध प्रकार आहेत. सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपातील ख्रिस्ती कॅनडामध्ये वास्तव्यासाठी आले. या ख्रिस्त्यांच्या डोळ्यांत हे मूळ निवासी खुपू लागले. त्यांची संस्कृती, रहाणीमान, भाषा हे सर्व वेगळे. युरोपातील ख्रिस्त्यांच्या लेखी ते ‘अशिक्षित’, ‘ग्राम्य’, ‘संस्कृतीशून्य’ होते. ‘जे ख्रिस्ती ते शहाणे आणि सभ्य’, अशा भ्रमात हे ख्रिस्ती वावरत होते. त्यामुळे जे ख्रिस्ती नाहीत, त्यांना अशा प्रकारे ‘शहाणे’ बनवण्यासाठी कॅनडातील ख्रिस्ती मिशनर्यांनी अघोरी उपाय अवलंबले. त्यासाठी मूळ निवासी असणार्यांच्या मुलांना निवासी शाळांमध्ये भरती करण्याचाचा पर्याय निवडण्यात आला. या शाळांमधील मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांना अन्य प्रकारेही शारीरिक त्रास देण्यात आले, तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरणही करण्यात आले. या मुलांना ‘कुत्रे’ म्हणून संबोधले जायचे. ख्रिस्त्यांसाठी बिगर ख्रिस्ती हे ‘सैतानाचे पूजक’ असतात. ‘तुमची संस्कृती, परंपरा आणि भाषा हीन आहे’, हे धर्मांध ख्रिस्त्यांकडून बिगर ख्रिस्त्यांच्या मनावर बिंबवले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे केवळ कॅनडातील शाळांपुरते मर्यादित नाही. भारतात तर चर्चप्रणीत शाळांमधून हिंदु मुलांचे वैचारिक धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. अमेरिका आणि युरोप येथील अनेक चर्चप्रणीत शाळांमध्ये मुलांच्या लैंगिक अत्याचारांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. थोडक्यात जगभर ख्रिस्ती मिशनर्यांकडून हे बिनबोभाटपणे चालू असतांना जगातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे झोपा काढत होते !
कॅनडाचे खरे स्वरूप उघड !
कॅनडातील मूळ निवासींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तेथील सरकारांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. वर्ष २००८ मध्ये या मूळ निवासी लोकांवर होणार्या अत्याचारांविषयी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात अत्याचार आणि मुलांची हत्या यांना ‘सांस्कृतिक वंशविच्छेद’ संबोधण्यात आले होते. तत्कालीन सरकारने मुलांच्या हत्यांविषयी क्षमा मागितली; मात्र त्याला वंशविच्छेद संबोधण्यास नकार दिला. तेथील राज्यकर्तेही मूळ निवासींच्या हक्कांविषयी किती उदासीन आहेत, याचे हे द्योतक.
कॅनडा हा विकसित देश. तेथील समाज हा प्रगत आणि पुढारलेला मानला जातो. कॅनडात मानवाधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा बोलबाला आहे. हाच देश फुटीरतावादी खलिस्तानवाद्यांना आश्रय देतो. का ? तर स्वतंत्र देशाची मागणी करणे, हे म्हणे त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य ! या देशाचे द्वार इस्लामी देशातील धर्मांध शरणार्थींसाठी खुले आहे ! याचे कारण कॅनडात मानवाधिकारांचा म्हणे आदर केला जातो ! म्हणजे फुटीरतावादी आणि धर्मांध, समाजकंटक यांच्याविषयी कॅनडाला पुळका; मात्र स्वतःच्याच देशातील मूळ लोकांच्या मानवाधिकारांचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे तीन तेरा वाजले असतांना त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ! हाच कॅनडा इतरांना मानवाधिकाराचे डोस पाजतो, हे संतापजनक आहे. कॅनडातील ख्रिस्त्यांनी केलेल्या या कुकर्माचा जाब विचारण्याची वेळ आली आहे !