समाजातील महत्त्वाचा घटक या नात्याने धर्मकर्तव्य करण्यासाठी डॉक्टरांनी कृतीशील व्हावे ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये २०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

श्री. मनोज खाडये

कोल्हापूर पृथ्वीवरील मानवाला तिसरे महायुद्ध नको असेल; परंतु महायुद्ध होणारच हेच सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती दर्शवते. संयुक्त राष्ट्राने केलेल्या युद्धाभ्यासाचा निष्कर्ष हाच आहे की, रशियायुक्रेन संघर्षातून तिसरे महायुद्ध लवकरच चालू होऊ शकते. पहिले आणि दुसरे महायुद्ध खेळण्यातील युद्ध वाटावे, असे महाभयंकर वाटणारे तिसरे महायुद्ध आता अटळ आहे. तसेच धर्माचरणाच्या र्‍हासामुळेच जगभर अधर्म माजला आहे. तरी या पुढील काळात समाजातील महत्त्वाचा घटक या नात्याने धर्मकर्तव्यांची जाणीव निर्माण होऊन डॉक्टरांनी कृतीशील होण्यासाठीच हा परिसंवाद आहे. ‘माझ्या भक्ताचा नाश कधीच होणार नाही’, या भगवान श्रीकृष्णाच्या वचनाची आठवण ठेवून आपण साधना करून त्याचे भक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच भीषण आपत्काळात तरून जाण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथील डॉक्टरांसाठी ‘सध्याच्या कठीण काळात रुग्णसेवा आणि साधना यांतून आनंद कसा मिळवायचा ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादासाठी २०० हून अधिक आधुनिक वैद्य, आयुर्वेदिक वैद्य, होमिओपॅथी वैद्य ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. या वेळी उपस्थित डॉक्टरांना सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनीही मार्गदर्शन केले.

साधना केल्याने जीवन तणावमुक्त होऊन प्रत्येक प्रसंगात आनंदी रहाता येते ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, सनातन संस्था

डॉ. ज्योती काळे

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. सध्या डॉक्टरांना स्वतःला स्थिर ठेवून रुग्ण, त्यांचे नातेवाइक आणि स्वतःचे कुटुंबीय यांची काळजी घेणे, अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात आनंदी रहाण्यासाठी साधना हाच एकमेव उपाय आहे. आपल्या जीवनातील ८० टक्के दुःखाचे मूळ कारण आध्यात्मिक आहे. यासाठी नामजप करणे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे अन् अष्टांग साधना करणे, हा यावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जीवनातील तणाव दूर होऊन त्यांना प्रत्येक कठीण प्रसंगात आनंदी आणि तणावमुक्त रहाता येईल.

डॉक्टरांचे अभिप्राय आणि अनुभव

१. डॉ. गोरख मंद्रुपकर, सांगली – सध्या वाढत्या आधुनिकतेमुळे धार्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. व्याख्यानात डॉ. ज्योती काळे यांनी मांडलेला विषय पटला. समाजातील महत्त्वाचा घटक या नात्याने मला राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करायला आवडेल.

२. डॉ. प्रवीण कोळी, बावची, सांगली – मी मागील २३ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहे. नामजपाचे महत्त्व समजल्यापासून नामजप करत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाइकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना अतीदक्षता विभागात ‘ऑक्सिजन’वर ठेवले होते. त्यांची प्रकृती खालावत जात होती. त्यांचा देवावर विश्वास नव्हता; मात्र त्यांना कोरोनाच्या काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन संस्थेने सांगितलेला नामजप करण्यास सांगितल्यावर त्यांनी तो चालू केला. नामजप करण्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.

३. डॉ. ज्ञानेश्वर पाटील – सध्या मी प्रतिदिन ३ घंटे नामजप करत आहे. यापुढे कोणता नामजप करावा, याविषयी मार्गदर्शन करावे. माझ्यातील दोष आणि अहं घालवण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी मार्गदर्शन करावे.

४. डॉ. अरविंद संकपाळ, इचलकरंजी, कोल्हापूर – मला यापूर्वी नामजपाचे महत्त्व कळल्यानंतर मी नामजप चालू केला. मी नामजप चालू केल्यापासून रक्तदाब आणि ताण न्यून करण्याच्या गोळ्या अल्प प्रमाणात घ्याव्या लागत आहेत. माझे मनोबल वाढले आहे.

विशेष

श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शनानंतर ‘प्रत्येक १५ दिवसांनी डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ बैठकीला उपस्थित राहूया’, असे आवाहन उपस्थितांना केले. त्या वेळी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

परिसंवादामध्ये सूक्ष्म प्रयोगाचा अभ्यास !

‘ऑनलाईन’ परिसंवादाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध संशोधनाविषयी माहिती देण्यात आली, तसेच या परिसंवादामध्ये उपस्थित डॉक्टरांना त्या संदर्भात एक सूक्ष्म प्रयोग करण्यास सांगितले होते. या वेळी उपस्थित डॉक्टरांना ‘पॉप’ गाणे, शांत संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत आणि संतांनी स्वतः रचलेले अन् गायलेले भजन ऐकवण्यात आले. या वेळी डॉक्टरांना सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदनांचा अभ्यास करण्यास सांगितले. या वेळी ‘संतांच्या आवाजातील भजन ऐकल्याने सात्त्विक स्पंदने अधिक प्रमाणात वातावरणात निर्माण झाली’, हे काही डॉक्टरांना जाणवले.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक