|
म्हापसा, ३० जून (वार्ता.) – येथील पोलीस ठाण्यातील ‘आय.आर्.बी.’ विभागातील पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर यांनी दंडाचे पैसे वैयक्तिक खात्यात ‘गूगल पे’द्वारे (भ्रमणभाष अथवा संगणक यांद्वारे पैसे हस्तांतर करण्याचे अॅप) भरण्यास लावल्याचे उघड झाल्यानंतर येथे खळबळ माजली आहे. संबंधित पोलीस शिपायावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
२८ जूनच्या रात्री सुमारे ८ वाजता मडगाव येथील गांधी चौकात काणकाबांध, म्हापसा येथील दिगंबर नारायण आमोणकर यांना दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान न केल्याने पोलिसांनी अडवले. दिगंबर आमोणकर यांच्याकडे चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मागितला असता तो त्यांनी पोलिसांना दाखवला. या वेळी दिगंबर आमोणकर यांनी स्वत:कडे रोख रक्कम नसल्याने दंड ‘गूगल पे’द्वारे ऑनलाईन भरत असल्याचे पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर यांना सांगितले. पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर यांनी या वेळी दिगंबर आमोणकर यांना वैयक्तिक अधिकोष खात्याचा क्रमांक देऊन तेथे १०० रुपये दंडाची रक्कम भरण्यास सांगितली. दिगंबर आमोणकर यांनी दंडाची रक्कम ‘गूगल पे’द्वारे पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर यांच्या अधिकोष खात्यात भरल्यानंतर त्यांना चलन देऊन पाठवण्यात आले; मात्र घरी आल्यावर चलन पाहिले असता दिगंबर आमोणकर यांना ते चलन अन्य कुणाच्या तरी नावाचे असल्याचे लक्षात आले. दिगंबर आमोणकर यांनी ही माहिती वृत्तवाहिनीत काम करणार्या त्यांच्या निकटवर्तियाला दिली. त्यानंतर याची माहिती त्वरित म्हापसा पोलिसांना देण्यात आली. पोलीस शिपाई स्वतःच्या व्यक्तीगत अधिकोष खात्यात दंडाची रक्कम स्वीकारू शकत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायाला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. म्हापसा येथील श्री बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.