प्रेमळ, व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्‍या कु. प्रणिता भोर !

ज्येष्ठ कृष्ण पक्ष षष्ठी (३०.६.२०२१) या दिवशी मूळच्या ठाणे येथील आणि आता रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. प्रणिता भोर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. प्रणिता भोर

कु. प्रणिता भोर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. कु. मानसी तिरवीर, सनातन आश्रम, रामनाथी गोवा 

१ अ. प्रेमभाव

‘प्रणिताताई माझी आईप्रमाणे काळजी घेते. मला कधी निराशा आल्यास ती मला योग्य दृष्टीकोन देऊन त्या स्थितीतून बाहेर काढते. माझ्या हाताला लागले असल्याने ती मला जड वस्तू उचलू देत नाही. मी कधी जड वस्तू उचलल्यास ती मला म्हणते, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना असे केलेले आवडेल का ?’’ साधकांना काही हवे असल्यास किंवा त्यांची प्रकृती ठीक नसल्यास ती त्यांची पुष्कळ काळजी घेते. माझ्या हाताला ‘प्लास्टर’ असतांना ती मला वेणी घालायला आणि वैयक्तिक आवरायला साहाय्य करत असे.

१ आ. व्यष्टी साधना गांभीर्याने करणे

१ आ १. नामजप पूर्ण करणे आणि मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करणे : प्रणिताताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करते. तिला अधिक घंटे नामजप करायचा असल्याने ती नामजप पूर्ण होण्याकडे लक्ष देते. ती व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेले प्रत्येक सूत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पूर्वी तिला मनमोकळेपणाने बोलता येत नव्हते. ती कुणाशी अधिक बोलत नसे. सौ. सुप्रिया माथूर यांनी तिला त्यावर प्रयत्न करायला सांगितल्यावर ती प्रत्येकाशी बोलू लागली. त्यामुळे ती सर्वांना आवडू लागली आणि साधक तिच्याशी सहजतेने बोलून तिचे साधनेत साहाय्य घेऊ लागले.

१ आ २. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रामाणिकपणे सूत्रे सांगणे : ताईकडून चुका झाल्यास ती त्याचे अंतर्मुख होऊन चिंतन करते. ती व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रामाणिकपणे सूत्रे सांगते. त्यामुळे सुप्रियाताईकडून तिला योग्य दृष्टीकोन मिळून प्रयत्न करणे सोपे जाते.

१ इ. इतरांना साधनेत साहाय्य करणे

ती मला ‘प्रतिदिन आज काय प्रयत्न केलेस ? काय शिकलीस ?’, असे विचारून ‘मी कुठे न्यून पडले ?’, ते सांगते. मला तिच्याशी मोकळेपणाने बोलता येते.

१ ई. भावपूर्ण सेवा करणे

ती पोळ्या करण्याची सेवा करतांना विविध प्रकारचे भाव ठेवते. तिच्याकडून मला ‘सेवा करतांना विविध प्रकारचे भाव कसे ठेवायचे ?’, ते शिकता येते.

१ उ. संतांप्रतीचा भाव

तिला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची पुष्कळ ओढ आहे. ती त्यांच्या सत्संगातील क्षण आणि त्यांनी सांगितलेले दृष्टीकोन आठवून अंतर्मुख होते. त्यांनी सांगितलेले दृष्टीकोन ती मला सांगते. मलाही त्यांतून पुष्कळ शिकता येते.

‘परात्पर गुरुदेव, ‘तुम्ही प्रणिताताईच्या माध्यमातून मला एक आध्यात्मिक सखी आणि मोठी बहीण दिलीत’, याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. कु. सायली पाटील, सनातन आश्रम, रामनाथी गोवा

२ अ. ‘प्रणिताला इतरांना आनंद झालेला पाहून पुष्कळ आनंद होतो.

२ आ. साधनेचे योग्य दृष्टीकोन देणे

मला कधी निराशा किंवा ताण आल्यास ती मला आपुलकीने त्याविषयी विचारते. ती मला ‘या परिस्थितीत काय करणे भगवंताला अपेक्षित आहे ? त्याला तू अशा प्रकारे उदास राहिलेली आवडेल का ?’, असे विचारून नंतर ‘योग्य काय असायला हवे ?’, हे सांगते.

२ इ. आधार देणे

प्रणिता नेहमी सर्वांना साहाय्य करते. त्यामुळे अनेक जणांना तिचा आधार वाटतो. तिला वैयक्तिक अडचणींविषयी सांगितल्यास ती योग्य दृष्टीकोन देते.

२ ई. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणे

आम्ही सध्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असल्याने साधनेच्या दृष्टीने एकमेकींचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न करतो. प्रणिताला तिच्या स्वभावदोषांची जाणीव झाल्यावर ती त्यांवर मात करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करते. ती नामजप, सारणी लिखाण, तसेच व्यष्टी साधनेचे अन्य प्रयत्न गांभीर्याने पूर्ण करते.

२ उ. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ 

१. ती प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करते. माझ्याकडून किंवा इतरांकडूनही सेवेत काही त्रुटी राहून सेवा अपूर्ण राहिल्यास प्रणिता ती सेवा पूर्ण करते. नंतर ती आम्हाला चुकांची जाणीवही करून देते.

२. प्रणिताकडे जिल्ह्यातील अनेक सेवा असल्याने ती आश्रमातील सेवा आणि व्यष्टी साधना करून जिल्ह्यातील सेवाही तळमळीने अन् गांभीर्याने पूर्ण करते. अनेक वेळा तिची शारीरिक स्थिती ठीक नसतांनाही ती भगवंताला शरण जाऊन आणि भावजागृतीचे प्रयत्न करून सेवा पूर्ण करते.

२ ऊ. कृतज्ञताभाव

‘मी शहरातील रज-तमाच्या वातावरणात राहूनही देवाने मला सतत साधनेत ठेवले. मला त्या वातावरणातही सतत अनुसंधानात ठेवले, तसेच त्या मायेतून काढून मला येथे आणून भगवंताने माझ्यात पालट घडवला’, असे सांगतांना तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

२ ऐ. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे परम दयाळू गुरुमाऊली, ‘या साधनेच्या प्रवासात तुम्ही मला साधनेत साहाय्य करणारी प्रणितासारखी आध्यात्मिक सखी दिलीत’, त्याविषयी मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘आम्हाला तुम्हाला अपेक्षित साधना आणि सेवा करता येऊ देत’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (१४.६.२०२१)

सतत धडपडत असतेस तू गुरुप्राप्तीसाठी ।

वैकुंठात आलीस तू मन अर्पण करण्यासाठी ।
सतत धडपडत असतेस तू गुरुप्राप्तीसाठी ।। १ ।।

भावजागृतीचे प्रयत्न करून संघर्षावर मात करतेस तू ।
गुरुचरणी जाण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांवर
मात करतेस तू ।। २ ।।

अंतर्मुख होऊन प्रयत्न करतेस तू ध्येयप्राप्तीसाठी ।
प्रत्येक सूत्र कृतीत आणतेस तू शिकण्यासाठी ।। ३ ।।

आता एकच प्रार्थना गुरुदेवांना । माझ्या प्रणिताताईला लवकर होऊ दे ईश्वरप्राप्ती ।। ४ ।।

कु. प्रणिता यांच्या नावाचा सुचलेला अर्थ

प्र – प्रेमाने सगळ्यांना जवळ करणारी ।

णि – निःस्वार्थ प्रेम करणारी ।

ता – ताईप्रमाणे सर्वांना सांभाळणारी ।

भो – भोळा आहे जिचा स्वभाव ।

र – रमते ती नेहमी गुरुस्मरणात ।

– कु. मानसी तिरवीर

करत राहूया साधना गुरुदेवांना अपेक्षित ।

मायारूपी सर्व बंधने सोडून ।
पोचलीस तू गुरुचरणांपर्यंत या रामनाथी ।। १ ।।

देवानेच जोडले आपल्याला एकमेकींशी ।
करण्या साहाय्य जलद आध्यात्मिक
उन्नती होण्यासाठी ।। २ ।।

देवाला अपेक्षित प्रयत्न करत राहूया सदैव आपण सर्वही ।
साहाय्य करूया एकमेकींना
स्वभावदोष अन् अहं यांवर मात करण्यासाठी ।। ३ ।।

आनंदी राहूया आपण प्रत्येक परिस्थितीत ।
करत राहूया साधना गुरुदेवांना अपेक्षित ।। ४ ।।

– कु. सायली पाटील

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक