बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

अनिल देशमुख

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल गृहमंत्री यांची सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी चालू आहे. या चौकशीच्या वेळी ‘ईडी’ने असा आरोप केला आहे की, निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबई येथील काही ‘पब्ज आणि बार’च्या मालकांकडून ४ कोटी रुपयांहून अधिक वसुली केली. वाझे यांनी देशमुख यांचे स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले. त्यानंतर या पैशातील एक वाटा देहली येथील ४ शेल आस्थापनांच्या माध्यमातून नागपूर येथील एका ‘चॅरिटेबल ट्रस्ट’कडे वळवण्यात आला.

१. मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

२. संस्थेत देणगी स्वरूपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम देहली येथील २ व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली होती.

३. नंतर या २ व्यक्तींची नावे बनावट आस्थापनांच्या नावाने नोंद करून आस्थापनांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळवण्यात आल्याचा दावा ‘ईडी’ने विशेष न्यायालयात केला.

४. या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय साहाय्यक शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही ‘एन्.आय.ए.’ने न्यायालयाला सांगितले.

५. सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या अन्वेषणाविषयी थेट सूचना दिल्याचे सांगितले.

६. एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील ‘बार’ आणि ‘पब’ आदी आस्थापनांकडून प्रति मास ३ लाख रुपये जमवण्यासही सांगितले होते. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली.

७. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ‘ऑर्केस्ट्रा बार’कडून १ कोटी

६४ लाख, तर पश्चिम उपनगरांतील आस्थापनांकडून २ कोटी ६६ लाख रुपये गोळा केले.

८. डिसेंबर २०२० मध्ये जया पुजारी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी इतरांच्या वतीने ४० लाख रुपये ‘गुड लक’ म्हणून दिले होते. ही सर्व रक्कम देशमुख यांचे स्वीय साहाय्यक शिंदे यांच्या हवाली करण्यात आली होती.