पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना किंवा मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना शेष रजा आणि एकतर्फी वेतनवाढ यांतील फरकाची रक्कम वर्ष २०१८ पासून दिली नाही. यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला १८० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. कर्मचार्यांची देणी तातडीने आणि एकरकमी द्यावीत, यासाठी महाराष्ट्र एस्.टी. कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष अन् व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने, तसेच वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची भेट घेऊन ही मागणी केली. कर्मचार्यांच्या एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरित रक्कम द्यावी, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर आणि सेवानिवृत्त यांची देणी तातडीने द्यावीत. अन्यथा ४ जुलै या दिवशी मध्यवर्ती कार्यकारिणीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे ‘महाराष्ट्र एस्.टी कामगार संघटने’चे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले.