क्षात्रधर्माला कमीपणा न येण्यासाठी औरंगजेबाच्या छावणीत इस्लाम न स्वीकारता आत्मबलीदान करणारे छत्रपती संभाजी महाराज !

‘छत्रपती संभाजीराजे हे प्रखर हिंदु धर्माभिमानी होते. राजा रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, ‘सांप्रत त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) असे वाटू लागले आहे की, आम्ही हिंदू म्हणजे सत्त्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काही अभिमान राहिला नाही. बादशहाची ही वागणूक यापुढे आम्हाला सहन होणे शक्य नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या क्षात्रधर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही.’ याच क्षात्रधर्माला कमीपणा येऊ नये म्हणूनच संभाजीराजांनी वढू-तुळापूरला औरंगजेबाच्या छावणीत इस्लाम धर्म न स्वीकारता आत्मबलीदान केले.

या बलीदानातून गवताला भाले फुटले, कुदळांच्या तलवारी झाल्या, दगडांचे तोफगोळे बनले. अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या बलीदानातूनच पुढे महाराणी येसूबाई, ताराराणी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण यांसारख्या मराठा वीर-वीरांगनांचा उदय झाला आणि या मराठी ज्वालामुखीच्या तडाख्यात औरंगजेब याच महाराष्ट्रभूमीत गाडला गेला. आज जागतिक आतंकवादाला चिरडण्यासाठी मृत्यूला आव्हान देणार्‍या आणि काळाच्या जबड्यात हात घालणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन निर्भीड समाज निर्माण होणे काळाची आवश्यकता आहे. अतुलनीय बलीदानातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खर्‍या अर्थाने मृत्यूंजय ठरले.’

– श्री. सचिन पांडुरंग जाधव, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, पुणे.