‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांना अखेर अटक !

डॉ. महेश जाधव

मिरज, १९ जून – कोरोना रुग्णांकडून भरमसाठ देयके घेणे, पुरेशी यंत्रसामुग्री नसतांना रुग्णांवर उपचार करणे, रुग्णांना देयक देण्यास टाळाटाळ यांसह अनेक अनियमितता असलेले ‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांना अखेर १८ जून या दिवशी पोलिसांनी अटक केली. गुन्हा नोंद झाल्यावर डॉ. जाधव यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आवेदन प्रविष्ट केले होते. हे आवेदन १८ जून या दिवशी फेटाळण्यात आल्यावर डॉ. जाधव यांनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून डॉ. जाधव यांना कासेगाव येथे पकडले.

अन्वेषणात आणखी एक समोर आलेली धक्कादायक गोष्ट म्हणजे ‘अपेक्स’मध्ये भरती झालेल्या २०५ रुग्णांपैकी ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १७ जून या दिवशी डॉ. महेश जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंद झाला आहे. ‘अपेक्स’मधील ६ कर्मचार्‍यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. गांधीचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस आता प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.