‘घरोघरी मातीच्या चुली’, असेच या घटनेवरून म्हणावे लागेल ! भारतातही अशा घटना घडल्या आहेत आणि घडत असतात !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये सत्ताधारी पीटीआय आणि विराधी पक्ष यांच्या खासदारांमध्ये शिवीगाळ करत धारिका (फाईल्स) फेकून मारल्याची घटना १५ जून या दिवशी घडली. या वेळी महिला खासदारही उपस्थित होत्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. त्यांनाही या खासदारांना आवर घालता आला नाही. अखेर वरिष्ठ सभागृहाच्या सुरक्षारक्षकांना बोलवण्यात आले. त्यानंतरही शिवीगाळ आणि एकमेकांवर धारिका फेकून मारण्याचे प्रकार चालूच होते. पाकिस्तानच्या दूरचित्रवाहिन्यांवर या सर्व प्रकाराचे थेट प्रक्षेपण चालू होते.
पी.एम्.एल्. (एन्.) पक्षाच्या खासदार मरियम औरंगजेब यांनी या संपूर्ण घटनेसाठी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवले. ‘इम्रान खान यांच्या ‘नव्या पाकिस्तान’मधील ही वास्तविकता आहे. इम्रान खान यांच्याकडून संसदेला आणि लोकशाहीला दुर्बळ करण्याचे प्रयत्न चालू आहेत’, असा आरोप मरियम यांनी केला.