कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची हानीभरपाई देता येणार नाही ! – केंद्र सरकार

नवी देहली – कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची हानीभरपाई देता येणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

यात केंद्र सरकारने म्हटले आहे की,

१. आपत्ती कायद्यांतर्गत अनिवार्य भरपाई केवळ भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात दिली जाऊ शकते.

२. अशी हानीभरपाई देणे, हे राज्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे आहे.

३. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारे यांचे उत्पन्न न्यून झाल्याने, तर दुसरीकडे आरोग्याच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याने आधीच केंद्र अन् राज्ये आर्थिक दडपणाखाली आहेत. त्यातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची हानीभरपाई देणे चालू केल्यास त्याचा कोरोना महामारीच्या विरोधातील लढाईसाठी वापरल्या जाणार्‍या निधीवर परिणाम होईल.