जर असा कट रचला होता, तर विजयन् यांनी तेव्हा किंवा आताही ते मुख्यमंत्री असतांना पोलिसांत तक्रार नोंदवून याची चौकशी का केली नाही ? कि आता केवळ राजकीय लाभासाठी ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत ?
कन्नूर (केरळ) – राज्यातील काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि खासदार के. सुधाकरन् यांनी ५० वर्षांपूर्वी माझ्या मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला होता, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केला आहे. सुधाकरन् यांच्या एका मुलाखतीवर प्रतिक्रिया देतांना विजयन् यांनी हा आरोप केला.
१. मुख्यमंत्री विजयन् यांनी सांगितले की, १९७० च्या दशकामध्ये मी विद्यार्थी संघटनेचे काम करत होतो. त्या वेळी स्थनिक काँग्रेस नेते आणि सुधाकरन् यांचे मित्र यांनी मला सतर्क केले होते की, सुधाकरन् यांचा माझ्या मुलांचे अपहरण करण्याचा कट आहे. माझी मुले लहान होती. या कटाविषयी मी माझ्या पत्नीला काहीही सांगितले नाही.
२. सुधाकरन् यांनी मुलाखतीत माहिती देतांना सांगितले होते की, महाविद्यालयीन शिक्षण घेतांना राजकीय संघर्षाच्या वेळी मी विजयन् यांना चोपले होते.
३. या घटनेविषयी विजयन् यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, सुधाकरन् खोटे बोलत आहेत. कदाचित् त्यांनी स्वप्नामध्ये मारहाण केली असेल.
४. विजयन् यांनी आरोप करतांना म्हटले की, काँग्रेसचे नेते पी. रामाकृष्णन् आणि एम्. दिवाकरन् यांनीच सुधाकरन् यांना भ्रष्ट, खुनी अन् अपहरणकर्ता म्हटले होते. सुधाकरन् यांच्यावर कन्नूर येथील पक्षाच्या कार्यालयाच्या बांधकामाच्या वेळी भ्रष्टाचार करण्यात आल्याचाही आरोप आहे. (जर असे आरोप आहेत, तर मुख्यमंत्री या नात्याने विजयन् यांनी या आरोपांचे अन्वेषण करण्याचा आदेश पोलिसांना का दिला नाही ? – संपादक)