कोल्हापूर – भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. अशी मागणी करूनही शासन-प्रशासन त्यावर गाफील असल्याचे दिसून येते. त्यामुळेच कोल्हापूर शहरात एका कोरोना केंद्रात महिलेच्या विनयभंगाचा प्रकार घडला. या प्रकरणाचा भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात येत असून कोरोना केंद्रातील महिला सुरक्षिततेविषयी तात्काल पाऊले न उचलल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन केले जाईल, अशा मागणीचे निवेदन भाजप महिला आघाडीच्या वतीने १७ जून या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
यांनतर भाजप महिला आघाडीच्या वतीने सदरचा प्रकार ज्या कोरोना केंद्रात घडला तेथे भेट देऊन तेथील महिला सुरक्षेचा आढावा घेतला. यावर तेथे अद्याप महिला पोलीस सुरक्षेसाठी नाहीत हे लक्षात आले. या वेळी केंद्रातील अधिकार्यांनी पोलीस सुरक्षेसाठी मागणी करणार असल्याची माहिती भाजप महिला शिष्टमंडळास दिली. या वेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, आसावरी जुगदार, शुभांगी चितारे, कोमल देसाई, स्वाती कदम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.