राणी लक्ष्मीबाई यांचा अतुलनीय पराक्रम !

१७ जून २०२१ या दिवशी राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

मे १८५७ मध्ये जोखन बाग येथे झालेल्या ब्रिटिशांच्या हत्याकांडासाठी इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाई यांना उत्तरदायी धरले आणि त्यांना पकडून आणण्यासाठी ह्यूज रोझ या अधिकार्‍याची नेमणूक केली. त्यानंतर इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले; पण इंग्रजांचा हा लढा अयशस्वी ठरला. अंतिमतः एप्रिल १८५८ मध्ये इंग्रज सैन्य झाशीच्या किल्ल्यात शिरले आणि त्यांनी तेथील ५ सहस्र लोकांची अमानुषपणे हत्या केली. या वेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या मुलाला पाठीवर घेऊन इंग्रजांचा वेढा तोडून बाहेर पडल्या. त्या १०२ मैलांचा प्रवास करून काल्पीला गेल्या आणि पेशव्यांना मिळाल्या. पुढे इंग्रजांनी काल्पीवर आक्रमण करून त्यावर विजय मिळवला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी सरदारांसह इंग्रजांची पाठराखण करणार्‍या ग्वाल्हेरच्या राजावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. पुढे इंग्रजांनी ग्वाल्हेरवर आक्रमण केले. या युद्धाच्या वेळी राणी लक्ष्मीबाईंच्या घोड्याला एक ओढा ओलांडता आला नाही. तेव्हा राणी इंग्रजांशी लढण्यासाठी पुन्हा युद्धभूमीकडे जाऊ लागल्या. त्या वेळी त्यांना गोळी लागली आणि त्या खाली पडल्या.

राणी लक्ष्मीबाई यांच्या निष्ठावान सेवकांनी त्यांचा शोध घेत जवळच्या गंगादास मठात नेले. राणीने ‘स्वतःचे शव इंग्रजांच्या हातात पडू नये, यासाठी तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत’, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली आणि मृत्यूला कवटाळले. भारतीय महिलांनो, शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांचे दैवी गुण आत्मसात करून राष्ट्रप्रेमी आणि सशक्त रणरागिणी बना !

संकलक : सौ. कोमल श्रीवत्सन, बेंगळुरू आणि सौ. रचना प्रशांत, चिकबळ्ळापूर, कर्नाटक