तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःत पालट करण्याचा ध्यास असलेले जुन्नर (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संजय जोशी (वय ५६ वर्षे) !

पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी जून २०२० मध्ये प्रतीगुरुपौर्णिमेच्या (गुरुपौर्णिमेची रंगीत तालीम) निमित्ताने सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन करत असतांनाच सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांची नावे टप्प्याटप्प्याने घोषित केली. याच वेळी जुन्नर (पुणे) येथील श्री. संजय जोशी यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. संजय जोशी

१. ‘जोशीकाकांचा तोंडवळा आनंदी असतो. ते नम्रतेने बोलतात.

२. प्रेमभाव

अ. ‘जुन्नर येथे सेवेनिमित्त गेल्यावर माझी काकांशी भेट होते. काकांच्या वागण्या-बोलण्यात प्रेमभाव, आपुलकी आणि नम्रता जाणवते.’ – कु. वैभवी भोवर, पुणे

आ. आम्ही (मी आणि बोरकरकाका) घरी दोघेच असतो. काका मधूनमधून स्वतःहून आमची विचारपूस करतात आणि आम्हाला काही ‘हवे-नको’ ते बघतात.’ – सौ. स्मिता बोरकर, जुन्नर, पुणे

३. सेवेची तीव्र तळमळ

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू झाल्यापासून काका नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतात. कोणताही ऋतू असला, तरी काकांच्या सेवेत खंड नसतो. त्यांचे नोकरीनिमित्त बारामती येथे स्थानांतर झाले होते. तेव्हा ते रविवारी जुन्नर येथे यायचे. तेव्हाही ते त्या दिवशी सेवा करायचे. ‘मला शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करता यावी’, असे ते म्हणतात.

४. गांभीर्य असणे

एकदा काकांना ‘तुमचा चूक स्वीकारण्याचा भाग अल्प असतो’, असे सांगितले. तेव्हा काका माझ्या घरी आले आणि ‘मी कसे प्रयत्न करू ?’, असे विचारून त्यांनी त्यावर पुष्कळ चांगले प्रयत्न आरंभ केले. त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये पालट केला.’ – सौ. स्मिता बोरकर, जुन्नर, पुणे

५. साधनेत प्रगती करण्याचा ध्यास असणे

‘सत्संगात ‘साधनेचे प्रयत्न आणि त्यासंबंधी ध्येय घेऊया’, अशी सूत्रे घेतली की, काकांची पुष्कळ भावजागृती होते. तेव्हा ते ‘ताई, मला साधनेत पुढे जायचे आहे. मी तळमळीने प्रयत्न करीन’, असे सांगतात. त्यांचे हे बोलणे पुष्कळ आतून असते आणि त्यामुळे माझीही भावजागृती होते.’ – कु. वैभवी भोवर

६. साधना करणारी मुले गुरूंच्या चरणी असल्याचा भाव

‘काका घरात आश्रमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघेही पूर्णवेळ साधना करत आहेत. ‘ती गुरूंच्या चरणी आहेत’, असा त्यांचा भाव असतो. ते मुलांची कधीच काळजी करत नाहीत.’ – सौ. स्मिता बोरकर

७. काकांमधील ‘नम्रता, न्यूनपणा घेणे, साधनेची तळमळ, साधक आणि सेवा यांच्याप्रतीचा भाव’, हे गुण पहाता  ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे’, असे जाणवते.

गुरुदेवांनी मला अशा साधकांकडून शिकण्याची संधी दिली. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. वैभवी भोवर (२०.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक