दूध दरासाठी राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा दूध उत्पादकांचा निर्णय !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नगर, १५ जून – दळणवळण बंदीचा अपलाभ घेत खासगी आणि सहकारी संस्थांनी आमच्याकडून दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटर अल्प केले, मात्र ग्राहकांना आहे त्याच दराने विक्री करत ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूटमार केली. दूध खरेदीचे पूर्वीचे दर पूर्ववत् लागू करावेत, अशी मुख्य मागणी करत राज्यातील दूध उत्पादकांनी १७ जून या दिवशी राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

तसेच खरीप हंगामात खतांची टंचाई, केंद्राने डिझेल, पेट्रोल आणि गॅस यांची केलेली दरवाढ, वाढलेले वीजदेयक आदीं प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.

सर्व दूध संघांचे ऑडिट करावे. प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती आणि त्याप्रमाणात दर किती अल्प देण्यात आले याविषयी सखोल चौकशी करावी. लुटमार टाळण्यासाठी खासगी आणि सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करावा. तसेच सर्वांचे विनामूल्य आणि त्वरित लसीकरण करावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.