नही जायेंगे काम को, क्या खायेंगे शाम को’, अशा घोषणांसह विविध फलक घेऊन व्यापार्‍यांचे अनोखे आंदोलन

‘दुकाने चालू करावीत’, या मागणीसाठी अडीच सहस्र व्यापार्‍यांचे कोल्हापुरात आंदोलन

हातात फलक घेऊन आंदोलन करणारे व्यापारी

कोल्हापूर – ‘दुकाने चालू करावीत’, या मागणीसाठी ९ जून या दिवशी अडीच सहस्र व्यापार्‍यांनी हातात फलक धरून आंदोलन केले. यात किराणा माल दुकानदारांसह अत्यावश्यक असलेल्या औषध दुकानदारांनीही सहभाग घेतला. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत व्यापार्‍यांनी बंद दुकानांसमोर थांबून विविध मागण्यांचे फलक हातात धरले होते. ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ या व्यापार्‍यांच्या शिखर संस्थेने केलेल्या आवाहनानुसार ४३ विविध संघटना या अनोख्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हातात फलक घेऊन आंदोलन करणारे व्यापारी

राजारामपुरी मुख्य रस्ता, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, उद्योग नगरातील वाहनदुरुस्ती करणारी दुकाने यांसह शहरातील इतर ठिकाणी व्यापारी त्यांच्या त्यांच्या बंद दुकानांसमोर थांबून होते. दुकानदारांच्या हातात असणारे फलक बोलके होते.

हातात फलक घेऊन आंदोलन करणारे व्यापारी

या संदर्भात ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, ‘‘२ मासांहून अधिक काळ सर्व दुकाने बंद आहेत; मात्र या काळातील कर, कामगारांचे वेतन, विजेचे देयक आणि इतर सर्व गोष्टी चालू आहेत. यासाठी अनुदान द्या; अन्यथा सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास अनुमती द्या, अशी मागणी आम्ही पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही अडीच सहस्रांहून अधिक दुकानदार या आंदोलनात सहभागी झालो आहोत. या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास दुकानदार स्वत:हून दुकाने चालू केल्याविना रहाणार नाहीत.’’