जालना – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात ते घुसखोरी करत आहेत, असा आरोप भाजपचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. ८ जून या दिवशी त्यांनी वसतीगृहाच्या ठिकाणी आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
१. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा मुला-मुलींसाठी वसतीगृह संमत केले होते. माजी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची जागा त्यासाठी अधिग्रहित केली होती.
२. आता राजेश टोपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय हालवण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. तशी पाटीही लावली आहे. या प्रकारामुळे लोणीकर संतप्त झाले आहेत.
३. ते म्हणाले की, आताचे सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घालत आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.