कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव ८ दिवसांत पाठवा ! – मंगेश जोशी, अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या (मृत्यू झालेल्या) १८ वर्षांखालील मुलांची काळजी घेणे आणि त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अशा ७ मुलांचा परिपूर्ण प्रस्ताव ८ दिवसांत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बालकांची काळजी आणि संरक्षण’ यांसाठीच्या कृतीदलाची बैठक ७ जूनला झाली. या बैठकीला जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष पी.डी. देसाई, पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विश्‍वनाथ कांबळी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी माहिती देतांना सांगितले की, दोन्ही पालकांचा मृत्यू झालेली ७ बालके आहेत, तर एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशी १०२ बालके आहेत, तसेच विधवा झालेल्या महिलांची संख्या ११६ आहे.

कोरोनाच्या काळात अवैध दत्तक प्रकरणे आणि बालविवाह रोखणे यांविषयी प्रत्येक तालुका पातळीवर जनजागृतीसाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाने भित्तीपत्रके (पोस्टर्स) लावावीत. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर येणारी सर्वच माहिती खरी नसते. तिची खात्री करण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकार्‍यांशी संपर्क करावा. त्याविषयी अधिकृत आणि योग्य माहिती संबंधित अधिकार्‍यांनी प्रसिद्ध करावी, असे अपर जिल्हाधिकारी जोशी यांनी सांगितले.