हिंदू मतभेद दूर करून संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वाेच्च न्यायालय

हिंदूंची संस्कृती आणि धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि कुंभमेळा यांचे आध्यात्मिक महत्त्व हे विश्वात अद्वितीय आहे. आपल्या राज्यघटनेत श्रीराम, श्रीकृष्ण आणि हिंदुत्व यांविषयीची अनेक चित्रे आहेत. कुणीही हिंदु देवतांची विटंबना केल्यास त्याला कायद्याने विरोध करता येतो. आपण आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यांविषयी ज्ञान देतो का ? याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करता येते. सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रथम आपापसातील मतभेद दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित होईल.