रायपाटण (रत्नागिरी) येथील आरोग्ययंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी वृद्ध रुग्णांना उपचारानंतर सोडले अर्ध्या रस्त्यात

कोरोना रुग्णांची परवड करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा !

रायपाटण (रत्नागिरी) येथील आरोग्ययंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी वृद्ध रुग्णांना उपचारानंतर सोडले अर्ध्या रस्त्यात

रत्नागिरी – आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका रायपाटण कोविड केंद्रामधून उपचार घेऊन बाहेर आलेल्या ३ वृद्ध रुग्णांना बसला आहे. हे रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यांच्यावर ६ दिवस रायपाटण येथे कोविड केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांना घरी सोडण्याचे दायित्व आरोग्य प्रशासनाकडे असतांना त्यांना ओणी-पाचल मार्गावरील गोरूलेवाडी थांब्यावर सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

सौजन्य : ETV भारत

या व्हिडिओमध्ये गोरूलेवाडी या ठिकाणी हे ३ रुग्ण त्यांच्या गावी जाण्यासाठी येणार्‍या वाहनांना हात दाखवत आहेत; मात्र दळणवळण बंदीमुळे दिवसभर या रुग्णांची परवड झाल्याचे पहायला मिळते. गोरूलेवाडी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांना ते कोरोनाबाधित असल्याचे समजले आणि त्यातूनच ही घटना समोर आली.

दोषींवर कारवाई करणार ! – डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

रुग्णांना असे रस्त्यात सोडणे चुकीचे आहे. या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात येईल. तसेच चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी स्पष्ट केले आहे.