देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत असतांना जाणीवपूर्वक इचलकरंजीकडे दुर्लक्ष ! – प्रकाश आवाडे, आमदार

देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २ जून – येथील ‘आय.जी.एम्.’ रुग्णालयात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. शासनाकडून मिळालेले ६ ड्युरा सिलेंडर गायब आहेत, ऑक्सिजन गळती चालूच आहे, आधुनिक वैद्य-कर्मचारी नाहीत. केवळ शासनाच्या दुर्लक्षाने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत असतांना जाणीवपूर्वक इचलकरंजीकडे दुर्लक्ष चालू आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे, अशी चेतावणी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणलेली वस्तुस्थिती गंभीर आहे ! यावर संबंधित यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘रुग्णालयास अचानक भेट देऊन पहाणी केली असता हा सर्व गोंधळाचा प्रकार उघडकीस आला. सध्या चालू असलेल्या ऑक्सिजन गळतीमुळे एका वाहिनीत बर्फसदृश्य पदार्थ जमा होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा अल्प दाबाने होत आहे, तसेच ही गळती दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकसारखी एखादी मोठी घटना झाल्यावर सरकार याकडे पहाणार आहे का ? विविध सामाजिक संस्थांनी दिलेले ६० ते ७० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ विनावापर पडून आहेत.

शासनाने ६ ड्युरा सिलेंडर दिलेले असतांना त्यातील ५ रुग्णालयात पोचले. एक कुठे गेला माहिती नाही. यातील ३ सिलेंडर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गडहिंग्लजच्या रुग्णालयात, तर अन्य दोन शहरातील एका खासगी रुग्णालयात दिल्याचे सांगितले गेले. इचलकरंजीत त्याची आवश्यकता असतांना ते अन्यत्र का हालवण्यात आले ? याचे दायित्व कोणाचे ? त्यामुळे या परिस्थितीची पहाणी केली अता या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.’’