चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता संसर्ग

ग्वांगदोंग शहरात दळणवळण बंदी

बीजिंग (चीन) – कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चीनमध्ये ग्वांगदोंग भागात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

१. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार ३१ मे या दिवशी चीनमध्ये २३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याच्या आदल्या दिवशी २७ नवे रुग्ण सापडले होते. यांपैकी १२ रुग्ण हे दक्षिण ग्वांगदोंग भागातील आहेत. हा प्रांत हाँगकाँगला लागून आहे. यामुळे या भागात दळणवळण बंदी सदृष्य स्थिती आहे. या प्रांताची राजधानी ग्वांगझूमध्ये दळणवळण बंदी  लावण्यात आला आहे.

२. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्याच्या वृत्तात म्हटले आहे की, ग्वांगझूमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. यामुळे तेथील बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. उपाहारगृहे, शाळा आदी बंद करण्यात आल्या आहेत.