५ सहस्र ८०० कोटी रुपयांच्या विमा हप्त्यांपैकी केवळ १ सहस्र कोटी रुपयांचे वितरण !
भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !
संभाजीनगर – पीक विम्याच्या हप्त्यापोटी ५ सहस्र ८०० कोटी रुपये आस्थापनांनी जमा केले आहेत; मात्र निकष डावलण्यासाठी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संगनमत करून केवळ १ सहस्र कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तालुका स्तरावर आणेवारी अल्प असतांना उत्पादन अधिक झाल्याचे दाखवण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री असूनही त्यांच्याच खात्यातील काही अधिकारी चुकीचे काम करत आहेत, असे सांगून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘येत्या ८ दिवसांत सचिव आणि कृषी संचालक यांंच्या समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले आहे. कोरोना संकटाचा लाभ घेऊन महसूल आणि कृषी अधिकारी यांच्या संगनमताने मोठा अपव्यवहार झाला आहे. आणेवारी अल्प असतांना २०७ टक्के वाढ दाखवण्यात आली. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे कृषी मंत्र्यांकडे दिली आहेत. पीकविमा आस्थापनांच्या प्रतिनिधींसह तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी ‘मॅच फिक्सिंग’ केले आहे. ८ दिवसांत न्याय न मिळाल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करीन, तसेच उच्च न्यायालयातही जाईन.’’