यवतमाळ येथील कै. रवींद्र अंबादास देशपांडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

२०.५.२०२१ या दिवशी यवतमाळ येथील श्री. रवींद्र अंबादास देशपांडे यांचे निधन झाले. ३१.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. रवींद्र देशपांडे

१. श्री. विपीन देशपांडे (चुलत भाऊ), यवतमाळ

१ अ. सर्वांशी जवळीक साधणे : ‘अनोळखी लोकांशी जवळीक साधण्याची अप्रतिम कला रवींद्रदादामध्ये होती. प्रशासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांपासून ते घरी येणार्‍या कामगारांपर्यंत सर्वांशी त्याचे संबंध चांगले होते. रुग्णालयात भरती केल्यावर ऑक्सिजन लावला असतांना माझा, तसेच इतरांचा ‘मिस्ड कॉल’ पाहून त्याने त्याही स्थितीत सर्वांना भ्रमणभाष केले. पूर्वी तो पूर्णवेळ साधना करत असतांना बर्‍याच जिल्ह्यांतील साधकांच्या संपर्कात आला. त्या जिल्ह्यातील कुणी व्यक्ती भेटल्यास तेथील ओळखीच्या साधकासाठी त्याचा आवडीचा खाऊ तो त्या व्यक्तीच्या समवेत पाठवत असे. तो सगळ्यांमध्ये मिसळायचा.’

२. श्री. विशाल देशपांडे (चुलतभाऊ), यवतमाळ  

२ अ. इतरांना साहाय्य करणे : ‘आमच्याकडे घरी बांधकामासाठी कामगारांची आवश्यकता होती; पण योग्य कामगार मिळत नसल्याने दोन दिवस काम होत नव्हते. हे त्याला समजल्यावर त्याने कामगार उपलब्ध करून दिला आणि ते काम पूर्ण झाले. आम्ही यवतमाळला आल्यावर आम्हाला छोट्या छोट्या अडचणी यायच्या तेव्हा त्याने स्वतःच पुढाकार घेऊन आम्हाला साहाय्य केले.

२ आ. देशपांडे घराण्यातील सर्व कुलाचार रवींद्रदादाच्या घरी होतात. प्रत्येक सणाला आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येतो. तेव्हा ‘ऐन वेळी येणार्‍या सर्व अडचणी सोडवून कार्यक्रम वेळेत कसा पार पडेल ?’, हे तो पहात असे.

२ इ. इतरांच्या चुका तो इतक्या सौम्यपणे सांगायचा की, चूक लक्षात येईल; पण मन दुखावणार नाही.’

३. सौ. अर्पिता देशपांडे (चुलत वहिनी) आणि कु. शिवानंद देशपांडे (पुतण्या, चुलत भावाचा मुलगा)

३ अ. हसतमुख : ‘ते सतत हसतमुख आणि आनंदी असायचे. त्यांना कधीही ताणात बघितले नाही.’

४. कु. शिवानंद विशाल देशपांडे (पुतण्या, चुलत भावाचा मुलगा)

४ अ. ‘त्यांच्या घरी गेल्यावर ते नेहमी माझ्याशी बोलायचे. त्यामुळे त्यांच्याकडे जायची इच्छा व्हायची. ते घरी नसले, तर मला चुकल्याचुकल्यासारखे वाटायचे.’

५. सौ. अर्पिता देशपांडे (चुलत वहिनी)

५ अ. संत आणि देवता यांच्याप्रतीचा भाव : ‘परात्पर गुरु देशपांडेकाकांनी देहत्याग केला. त्यानंतरच्या सगळ्या सेवा त्यांनी भावपूर्ण केल्या. यातून त्यांचा संतांप्रती असलेला भाव जाणवतो. त्यांच्याकडे श्री महालक्ष्मीदेवीचा तांदळा आहे. ते त्याची प्रतिदिन सोवळ्यात पूजा आणि आरती करत असत. ते आरती, स्तोत्र इत्यादी भावपूर्ण आणि लयबद्ध म्हणायचे.’

६. श्री. विपीन देशपांडे आणि सौ. अर्पिता देशपांडे (चुलतभाऊ आणि चुलतवहिनी)

६ अ. कौटुंबिक दायित्व पार पाडणे : ‘दादांना दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. कुणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते पुढाकार घेऊन अडचण सोडवत असत. ते कुटुंबे एकत्र जोडून ठेवत असत.

यवतमाळ येथे आमचे वयस्कर काका-काकू दोघेच रहातात. त्यांना काय हवे-नको, ते त्यांनी शेवटपर्यंत पाहिले.

६ आ. रवींद्र देशपांडे यांच्यामध्ये मागील वर्षभरात जाणवलेले पालट

१. मागील वर्षभरात त्यांच्यामध्ये सकारात्मक पालट जाणवत होता.

२. त्यांच्यातील इतरांकडून असलेल्या अपेक्षा न्यून झाल्याचे लक्षात येत होते.

३. मोठ्याने बोलण्याचा भाग न्यून झाल्याचे जाणवत होते.

४. एकदा सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी सेवेविषयी सत्संग घेतला. त्यानंतर भेट झाली असता त्यांच्या बोलण्यामध्ये सद्गुरु जाधवकाका यांच्याविषयी भाव आणि सकारात्मकता जाणवत होती.

५. पत्नीला साधनेत साहाय्य करण्याचे प्रमाण वाढल्याचे जाणवत होते.

६. मुलांची साधना होण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे मुलांचा समष्टीत सहभाग घेण्याचा उत्साह वाढत होता.

७. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

७ अ. श्री. विपीन देशपांडे आणि सौ. अर्पिता देशपांडे (चुलतभाऊ आणि चुलतवहिनी)

१. निधन झाल्यावर ते शांतपणे झोपल्यासारखे वाटत होते.

२. रुग्णालयातून मृतदेह घरी आणल्यावर त्यांचा तोंडवळा अतिशय प्रसन्न, हसरा आणि शांत दिसत होता. त्यांच्या तोंडवळ्यावर एक प्रकारचे तेज आले होते.

३. मृतदेह घरात ठेवला असतांना वातावरणात कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नव्हता. अंत्यसंस्कार झाल्यानंतरच्या दिवसांतही घरात दाब किंवा तणाव जाणवला नाही.’

७ आ. कु. सायली देशपांडे (मुलगी) आणि कु. गौरी देशपांडे (पुतणी)

१. ‘त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेत असतांना आकाशात ढगांची रचना सिद्ध झालेली दिसली.’

७ इ. श्री. सचिन शामराव कुळकर्णी, वाशीम (भाचा)

१. ‘सकाळी निधनाची बातमी कळल्यापासून यवतमाळ येथे जाण्याची सिद्धता करतांना अनेक अडथळे आले. अडथळे येऊनही आम्हाला मामाचे अंतिम दर्शन मिळाले आणि पार्थिवाला खांदा देता आला.

२. स्मशानभूमीत मृतदेहाला हळद-कुंकू वहातांना त्यांचे पाय हळद लावल्याप्रमाणे पिवळे झालेले दिसले.’ (मे २०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक