फेसबूकचा हिंदुद्वेष !
|
मुंबई – हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांची पाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत. याविषयीची कोणतीही कल्पना किंवा कारण फेसबूककडून हिंदु जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात यांना देण्यात आलेले नाही. ‘हिंदू अधिवेशन’ या फेसबूक पानाची सदस्य संख्या १४ लाख ४५ सहस्र इतकी होती. हे पान ‘व्हेरिफाईड पेज’ (संघटनेचे अधिकृत मान्यता असलेले पेज) होते. याशिवाय समितीची राज्यस्तरीय पानेही कार्यरत आहेत. त्यामधील एकूण ३४ पैकी १८ पानेही बंद करण्यात आली आहेत. या सर्व पानांवरून राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडी, तसेच धर्मशिक्षणाच्या नियमित ‘पोस्ट्स’ करण्यात येत होत्या. या सर्व ‘पोस्ट’ कायद्याच्या चौकटीतच करण्यात येत असल्याचे मत समितीने मांडले आहे. फेसबूकच्या या मुस्कटदाबीमुळे १४ लाख ४५ सहस्र सदस्य धर्मशिक्षण आणि राष्ट्र अन् धर्म वार्ता यांपासून वंचित रहात आहेत. पान पुन्हा चालू करण्यासाठी समितीकडून फेसबूकला पत्र पाठवण्यात आले आहे; मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. तसेच याविरोधात कायदेशीर प्रक्रियाही चालू करण्यात आल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.
नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ‘फेसबूक पेज’ची ७ सहस्र ५०० हून अधिक सदस्य संख्या होती. या पानावरून राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच धर्मशिक्षण आणि संतांचे विचार आदींचा नियमितपणे प्रसार केला जात होता.
फेसबूककडून उत्तर नाही !
‘सनातन शॉप’च्या पानाची सदस्य संख्या ५ सहस्र ६०० इतकी होती. या पानावरून सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांच्या संदर्भातील पोस्ट करण्यात येत असत. यांत आयुर्वेद, अध्यात्म, साधना, आपत्काळ, सण-धार्मिक उत्सव, बालसंस्कार इत्यादी विषयांचा समावेश आहे. ‘शॉप’चे पान फेसबूकवरून काढून टाकण्यात आले. हे पान पुन्हा चालू करण्यासाठी सनातनकडून फेसबूकला पत्र पाठवण्यात आले आहे; मात्र अद्याप फेसबूककडून कोणतेही उत्तर आलेले नाही.
वर्ष २०१२ मध्येही हिंदु जनजागृती समितीचे अधिकृत ‘पेज’ कोणतेही कारण न देता बंद करण्यात आले होते. गेल्या वर्षी सनातन संस्थेचे पान, तसेच प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांचे अधिकृत फेसबूक पानही कोणतेही कारण न देता फेसूबकने बंद केले होते. हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘सुदर्शन न्यूज’चे, ‘फेसबूक पेज’ही काही कालावधीपूर्वी बंद करण्यात आले आहे.