सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील घडामोडी

सावंतवाडी येथे कोरोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

सावंतवाडी – येथील भोसले पॉलिटेक्निक कॉलेजमधील ‘कोविड केअर सेंटर’मधील कोरोनाबाधित रुग्णाने २९ मे या दिवशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र या रुग्णाला अखेर तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आणि पोलीस निरीक्षक फूलचन्द्र मेंगडे यांनी वाचवले.

८ दिवसांपूर्वी हा रुग्ण आणि त्याचा भाऊ यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. २९ मे या दिवशी सायंकाळी दोघांना घरी सोडण्यात येणार होते; मात्र त्यातील एकाने आपल्या भावाची नजर चुकवून इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गच्चीवर जात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

‘रॅपिड टेस्ट’मध्ये सापडत आहेत कोरोनाबाधित रुग्ण

वेंगुर्ले – तालुक्यातील शिरोडा बाजारपेठेत अनावश्यक फिरणार्‍या ३६ व्यक्तींची ‘रॅपिड टेस्ट’ करण्यात आली. यामध्ये दोघे कोरोनाबाधित आढळल्याची माहिती शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.

देवगड – तालुक्यातील देवगड, जामसंडे शहरासह हिंदळे, शिरगाव, पडेल, तळेबाजार या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍या एकूण ५०० जणांची ‘रॅपिड टेस्ट’ करण्यात आली. यामध्ये २७ जण कोरानाबाधित आढळले. या सर्वांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये भरती करण्यात आले आहे.

… तर कोरोना संपेपर्यंत दुकानांना टाळे ठोकणार !

कणकवली – कोरोनाच्या काळात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यास मुभा आहे. असे असतांनाही नियमभंग करून अन्य दुकानेही चालू ठेवण्याचे प्रकार कणकवली शहरात घडत आहेत. वारंवार सूचना देऊनही अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील, तर अशा दुकानांना कोरोना महामारी संपेपर्यंत टाळे ठोकणार असल्याची चेतावणी  कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली आहे.