आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

आगामी काळात तिसरे महायुद्ध होऊन त्यात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, तसेच भीषण नैसर्गिक आपत्तीही ओढवतील, असे संतांचे भाकीत आहे. आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्वती नसते. सध्या कोरोनामुळे ही स्थिती सर्वत्र अनुभवण्यास येत आहे. आपत्काळात आयुर्वेदाच्या औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल. योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे, ही काळाची नितांत आवश्यकता आहे. नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित विविध कारणांमुळे अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांच्या लागवडीमुळे त्यांच्या संवर्धनासह आपले आरोग्य टिकवण्यासही साहाय्य होणार आहे. भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असणार आहे. यादृष्टीनेही आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी वनौषधींची लागवड करणे आवश्यक ठरते. आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याच्या संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड करणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे. या लेखात दिलेली माहिती  सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ यातून संकलित केलेली आहे. सविस्तर माहितीसाठी वाचकांनी हा ग्रंथ अवश्य पहावा.

१. औषधी वनस्पतींच्या लागवडीपूर्वी लक्षात घेण्याची सूत्रे

अ. ‘औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड पावसाळ्याच्या आरंभी, म्हणजेच १५ जून ते १५ जुलै या कालावधीत केल्यास त्यांची वाढ चांगली होते. पावसाळ्यापूर्वी बियांपासून रोपे बनवावीत आणि ती ४-५ इंच वाढल्यावर कुंड्यांमध्ये  किंवा भूमीत (जमिनीत) लावावीत. पावसाळ्यापूर्वी बियांपासून रोपे बनवणे आदर्श आहे; परंतु पावसाळ्यात बियांपासून रोपे बनवायची असल्यास पावसापासून संरक्षण व्हावे आणि सूर्यप्रकाशही मिळावा, यासाठी जिथे बी रुजत घातले आहे. त्या ठिकाणी पारदर्शक प्लास्टिक किंवा काच यांचे आच्छादन करावे. पेरलेले बी मुंग्यांनी किंवा किडींनी खाऊ नये, यासाठी लेखाच्या शेवटी दिलेल्या चौकटीनुसार उपाययोजना करावी.

आ. लागवड करण्यापूर्वी बियाणे, रोपे, कुंड्या इत्यादी सामान जमवणे, खड्डे खोदणे यांसारखी पूर्वसिद्धता करावी लागते.

इ. औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. सर्वच वनस्पती सर्वांनी लावणे अशक्य आणि अव्यवहार्य आहे. यासाठी जागेची उपलब्धता आणि त्या त्या औषधी वनस्पतीची विविध रोग दूर करण्याची क्षमता यांनुसार औषधी वनस्पती लावण्याचा एक ढोबळ प्राधान्यक्रम येथे दिला आहे. याला अनुसरून प्रत्येकानेच आपापल्या क्षमतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड करावी.

ई. एखादी वनस्पती किती संख्येमध्ये लावावी, हे प्रत्येकाने स्वतःच्या आवश्यकतेनुसार तारतम्याने ठरवावे. यंदाच्या वर्षी लागवड करण्याचे ठरवलेल्या वनस्पतींचे प्रत्येकी न्यूनतम १ रोपटे लावण्याचा संकल्प प्रत्येकानेच करावा.

उ. वाचकांनी आवश्यकतेनुसार तारतम्याने स्थानिक जाणकार किंवा वैद्य यांच्याशी विचारविनिमय करून लागवड करावी.

ऊ. लागवड केलेल्या वनस्पतींची ओळख कुटुंबातील अन्य सदस्यांनाही करून देण्यासह तिच्याजवळ तिच्या नावाची पाटीही लावावी. यामुळे सर्वांनाच या वनस्पतीची ओळख होईल.

ए. काळ कुणासाठीही थांबत नाही, हे जाणून वेळ वाया न घालवता शक्य तेवढ्या लवकर आपापल्या क्षमतेनुसार औषधी वनस्पती लावण्याचे नियोजन करून लागवड पूर्ण करावी.

२.  प्रस्तुत लेख वाचतांना लक्षात घेण्याची सूत्रे

अ. या लेखात भारताच्या बहुतेक भागांत सहजपणे होऊ शकतील अशा निवडक औषधी वनस्पतींची नावे दिली आहेत.

आ. औषधी वनस्पतींची नावे प्रदेशांनुसार पालटू शकतात, हे जाणून प्रत्येक वनस्पतीचे लॅटिन नावही दिले आहे. लॅटिन नावांच्या आधारे ‘इंटरनेट’वरून वनस्पतीची छायाचित्रे, तसेच अन्य माहिती जाणून घेता येईल.

इ. काही औषधी वनस्पती ओळखता येत नसल्यास त्यांसंबंधी स्थानिक जाणकार किंवा वैद्य यांना विचारावे.

ई. या लेखात नमूद केलेल्या औषधी वनस्पतींव्यतिरिक्त इतरही औषधी वनस्पतींची लागवड करण्यास आडकाठी (हरकत) नाही.

३. प्रत्येकालाच लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती

पुढील सारणीत सर्वत्र होऊ शकणार्‍या आणि अतीमहत्त्वाच्या अशा २७ औषधी वनस्पतींची नावे दिली आहेत. यांतील शक्य तेवढ्या वनस्पती आपल्या घराभोवती किंवा परिसरात असाव्यात. सारणीतील वनस्पतींची नावे प्राधान्यक्रमानुसार दिली आहेत, म्हणजे २७ व्या क्रमांकाच्या वनस्पतीपेक्षा २६ व्या क्रमांकाची वनस्पती जास्त प्राधान्याची आहे. या क्रमाने पहिल्या क्रमांकाची वनस्पती सर्वाधिक प्राधान्याची आहे. त्यामुळे २७ वनस्पती लावणे शक्य नसल्यास प्राधान्यक्रमानुसार शक्य तेवढ्या वनस्पती लावाव्यात. यांतील ज्या वनस्पतींच्या नावापुढे ‘*’ अशी खूण आहे, त्या वनस्पतींचे सविस्तर औषधी उपयोग सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ यात दिले आहेत. अन्य वनस्पतींचे उपयोग सनातनचे ग्रंथ ‘११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ आणि ‘९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ यांत मिळतील.

 

घराभोवती पुरेशी जागा नसल्यास या सूचीतील शेवगा, कडूनिंब, पारिजातक आणि बेल या वृक्षवर्गीय वनस्पती सोडून अन्य वनस्पती कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लावून घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील. यांपैकी गुळवेल, जाई, विड्याच्या पानांची वेल आणि शतावरी या वनस्पतींना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. निर्गुंडी, अडूळसा आणि जास्वंद या झुडुप वर्गीय वनस्पती ३ वर्षांपर्यंत कुंड्यांमध्ये ठेवता येतात. या वनस्पतींची वाढ जास्त झाल्यास त्या भूमीत (जमिनीत) लावाव्या लागतात; परंतु नियमित छाटणी करून त्यांची वाढ मर्यादेत ठेवल्यास त्या कायम कुंड्यांमध्ये ठेवता येतात. या वनस्पती बहुतेक रोगांवर उपयुक्त असल्याने प्रत्येकानेच या वनस्पती आपल्या भोवताली लावाव्यात. जागा शेष असल्यास यांव्यतिरिक्त अन्य वनस्पतीही लावाव्यात. जागा न्यून असल्यास एका मांडणीत वनस्पतींच्या कुंड्या एकावर एक ठेवाव्यात. ही मांडणी सर्व वनस्पतींना दिवसातून न्यूनतम ३ – ४ घंटे ऊन लागेल, अशा पद्धतीने सज्जात ठेवावी. ज्यांच्या घराभोवती  जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा वनस्पती घराच्या सज्जामध्ये न लावता घराभोवती लावाव्यात. यांतील वेली परसातील मोठ्या झाडाच्या (शक्यतो कडुनिंबाच्या) मुळाशी किंवा कुंपणावर लावाव्यात.

टीप : वनस्पतीच्या लॅटिन नावाच्या खाली अधोरेखन करण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत असल्याने ती नावे अधोरेखित केली आहेत.

टीप – ‘पंच’ म्हणजे ‘पाच’ आणि ‘अंग’ म्हणजे ‘वनस्पतीचा भाग.’ वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ या पाचही भागांना एकत्रितपणे ‘पंचांग’ असे म्हणतात. लहान औषधी वनस्पतींच्या संदर्भात ‘पंचांग’ म्हणजे ‘मुळासकट संपूर्ण वनस्पती.’

४. लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कुठे मिळतात ?

४ अ. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची रोपे मिळू शकणारी ठिकाणे मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती पाहिजे असल्यास त्या पुढील ठिकाणी मिळू शकतात. त्या त्या संस्थेच्या नावापुढे कंसात संपर्क क्रमांक दिला आहे.

४ अ १. महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे आणि त्यांतील उपविभाग

अ. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (०२३५८-२८२०६४)

आ. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (०७२४-२२५८३७२)

इ. सुगंधी आणि औषधी वनस्पती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (०२४५२- २३४९४०८)

ई. अखिल भारतीय औषधी सुगंधी वनस्पती आणि पानवेल संशोधन योजना, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. (०२४२६-२४३३१५, २४३२९२)

४ अ २. महाराष्ट्रातील काही खासगी रोपवाटिका (नर्सरी)

अ. कोपरकर नर्सरी, गवे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (०२३५८-२८२१६५/२६७५२१, ९४२२४३१२५८)

आ. इको फ्रेंडली नर्सरी, परंदवाडी, सोवटणे फाट्याजवळ, जि. पुणे. (९४२२२२४३८४, ९२२५१०४३८४)

इ. ए.डी.एस्. नर्सरी, कशेळे, कर्जत-मुरबाड रस्ता, जि. रायगड.

ई. धन्वन्तरि उद्यान, पिंपळगाव उज्जैनी, जि. नगर. (९६७३७६९६७६)

४ अ ३. अन्य राज्यांतील महत्त्वाच्या शासकीय संस्था

अ. सीएस्आय्आर् – केन्द्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थान (सीमॅप), लखनौ, उत्तरप्रदेश (०५२२-२७१८६२९)

आ. औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय, बोरीयावी, गुजरात. (०२६९२-२७१६०२)

इ. जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपूर, मध्यप्रदेश (०७६१-२६८१७०६)

ई. फाऊंडेशन फॉर रीव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडीशन्स (एफ्.आर्.एल्.एच्.टी.), बेंगळुरू, कर्नाटक (०८०-२८५६८०००)

४ आ. अन्य ठिकाणे

१. खेडेगावांमध्ये, तसेच त्यांच्या शेजारील जंगलात पुष्कळ औषधी वनस्पती उपलब्ध असतात. तेथील जाणत्या रहिवाशांना या वनस्पतींविषयी माहितीही असते. शहरात रहाणारे बहुतांशी लोक सुटीच्या निमित्ताने गावाला जात असतात. अशा वेळी त्यांना लागणार्‍या वनस्पतींचे बियाणे किंवा रोपे त्यांना खेडेगावांतून आणता येतील.

२. प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कुठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते.

३. पुष्कळ आयुर्वेद महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेद महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.


औषधी वनस्पतींची रोपे मिळण्याचे गोव्यातील ठिकाण

गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाद्वारे औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते. या विभागाच्या वालकिणी, सांगे आणि घोटमोड, उसगांव, फोंडा आदी ठिकाणी रोपवाटिका आहेत. यांपैकी वालकिणी गावातील रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध लहान औषधी वनस्पतींची रोपे अल्प दरात मिळतात. देवस्थान समिती, समाजसेवी संस्था आदींना गोव्यातील वनखात्याच्या ‘वनमहोत्सव’ या उपक्रमाच्या अंतर्गत औषधी वनस्पतींचे विनामूल्य वितरणही केले जाते. गोव्यातील इच्छुक व्यक्ती औषधी वनस्पतींच्या रोपांसाठी गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाला संपर्क करू शकतात.

संपर्कासाठी पत्ता –

Dy. Conservator of Forests Research and Utilisation Division and CEO – State Medicinal Plants Board – Goa.

Phone: 0832 – 2750099


आपत्काळाच्या दृष्टीने मातीच्या कुंड्यांपेक्षा अन्य पर्याय वापरणे जास्त चांगले

‘मातीच्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे’ हे झाडांच्या वाढीच्या दृष्टीने आदर्श आहे; परंतु मातीच्या कुंड्या हाताळतांना फुटू शकतात. आपत्काळामध्ये काय होईल, याची शाश्‍वती नसल्याने कुंड्या फुटून होणारी हानी टाळण्यासाठी या काळात मातीच्या कुंड्यांपेक्षा पत्र्याची पिंपे, तेल भरून येणारे पत्र्याचे डबे, प्लास्टिकच्या गोण्या, पिशव्या, डबे किंवा पिंपे आदी पर्यायी साधनांचा वापर करणे जास्त चांगले. या पर्यायी साधनांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांच्या तळापासून अर्धा इंच उंचीवर २ – ३ छिद्रे ठेवावीत. तळावर छिद्रे ठेवल्यास झाडांची मुळे जमिनीत जाण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तळावर छिद्रे ठेवू नयेत.’ – श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा. (२८.५.२०२०)


कुंडीतील झाडांवरील किडींचा प्रतिबंध करण्याचे घरगुती उपाय

काही वेळा कुंडीतील झाडांना मुंग्या, अळ्या, कोळी यांसारखे कीटक उपद्रव करतात. हे कीटक झाडाची पाने खाऊन टाकतात किंवा ती खराब करतात. मोठ्या अळ्या असल्यास त्या वेचून काढून माराव्यात. झाडावरील किडींना प्रतिबंध करण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही घरगुती उपाय करून पहावेत.

१. दोन चमचे तंबाखू पाऊण तांब्या पाण्यामध्ये सकाळी भिजत घालून दुपारी तो त्याच पाण्यात उकळून त्याचा अर्धा तांब्या काढा करावा. हा काढा थंड झाल्यावर फवार्‍याच्या बाटलीत भरून सायंकाळच्या वेळेस कुंडीतील झाडावर सर्व बाजूंनी फवारावा. बहुतेक किडी सायंकाळच्या वेळेस येत असल्याने या वेळेत फवारणी करणे इष्ट ठरते. किडी पानांच्या खाली लपलेल्या असल्याने पानांच्या खालूनही फवारणी करावी.

२. कडुनिंबाचाही काढा करून त्याची फवारणी करता येते.

३. काही वेळा नुसत्या कापराच्या अथवा हिंगाच्या पाण्यानेही मुंग्या – किडी पळून जातात. कापराचे किंवा हिंगाचे पाणी करतांना हिंग किंवा कापूर पुरेशा पाण्यामध्ये उग्र वास येईल एवढ्या प्रमाणात घालावा.’

– श्री. माधव रामचंद्र पराडकर, व्हाळशी, डिचोली, गोवा.

औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करण्याचे महत्त्व

माणसातील गुणदोषांसाठी जसे आजूबाजूचे वातावरणही एक कारण असते, तसेच वनस्पतींच्या संदर्भातही आहे. औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. साधनेमुळे सत्त्वगुण वाढतो. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.