साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, वैशाख मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
२. शास्त्रार्थ
२ अ. अमृत योग : सोमवारी श्रवण नक्षत्र आणि शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यास ‘अमृत योग’ होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. ३१.५.२०२१ या दिवशी हा योग सूर्योदयापासून सायंकाळी ४.०२ पर्यंत आणि ४.६.२०२१ या दिवशी सायंकाळी ८.४७ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्याला विलंब होण्याचा संभव असतो. ३१.५.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०६ पासून १.६.२०२१ या दिवशी दुपारी १२.५१ पर्यंत आणि ४.६.२०२१ या दिवशी दुपारी ३.११ पासून उत्तररात्री ४.०८ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. २.६.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०६ पर्यंत अष्टमी तिथी आहेे.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ३.६.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.२३ पासून ४.६.२०२१ या दिवशी रात्री ८.४७ पर्यंत आणि ५.६.२०२१ या दिवशी रात्री ११.२८ पासून दुसर्या दिवशी सकाळी ६.२० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
टीप १ : भद्रा (विष्टी करण), कालाष्टमी, घबाड मुहूर्त आणि अमृत योग यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२२.५.२०२१)