|
अयोध्या (उत्तरप्रदेश) : कधी काशी विश्वनाथ, कधी श्रीरामजन्मभूमी, मथुरा, संभल, हरिहर भूमी, तर कधी भोज येथे मंदिरे उद्ध्वस्त आणि अपवित्र केली जात आहेत. ज्यांनी मंदिरे अपवित्र केली, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. औरंगजेबाचा वंशज आता रिक्शा चालवत आहे. जगात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर सनातन धर्मच करू शकतो. सनातन धर्म भारतातील राष्ट्रीय धर्म आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते येथील एका धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी आले होते. तत्पूर्वी त्यांनी श्रीराममंदिर आणि हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेतले.
सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्व जण सुरक्षित !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, जगात मानवता वाचवायची असेल, तर सनातन धर्माचे रक्षण करावे लागेल. सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्व जण सुरक्षित आहेत. सनातन धर्म कोणतेही मत किंवा धर्म नाही. त्यात सर्वांच्या हिताची चर्चा आहे. सनातन धर्मात ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (सर्व जग एक कुटुंब आहे) उल्लेख आहे. सनातन धर्माने जगातील प्रत्येक जाती, पंथ, धर्म आणि संप्रदाय यांच्या लोकांना आपत्तीच्या काळात आश्रय दिला.
धार्मिक वारसा विसरून भौतिक विकास साधता येणार नाही !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ही सृष्टी श्रीहरीच्या कृपेने चालत आहे. धार्मिक वारसा विसरून भौतिक विकास साधता येणार नाही. धार्मिक वारसा आणि भौतिक विकास यांच्यात समन्वय असावा. भारताची परंपरा त्याच्या आवडत्या देवता, धार्मिक स्थळे आणि मूल्ये यांवर आधारित आहे. ही मूल्ये लक्षात ठेवून पुढे गेलो, तर भारत टिकेल.