केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने राबवला जाणार उपक्रम
पणजी – केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने २८ मेपासून राज्यात ‘आयुष-६४’ गोळ्यांचे वितरण करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. पाटो, पणजी येथील पाटो भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.
आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर राबवल्या जाणार्या या मोहिमेचा लाभ कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आहे. घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक किंवा प्रतिनिधी यांनी आधार कार्ड, ‘आर्.टी-पी.सी.आर्.’ चाचणीचा दाखला किंवा ७ दिवसांच्या आत जलद चाचणीद्वारे कोरोनाबाधित झाल्याचा दाखला आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ चाचणी अहवाल सुपुर्द करून ‘आयुष-६४’ औषध विनामूल्य मिळवता येईल. आयुष मंत्रालय आणि ‘सी.एस्.आय्.आर्.’ यांनी संयुक्तपणे केलेल्या अनेक चाचण्यांनंतर हे औषध हलक्या आणि मध्यम प्रकारच्या कोरोनाबाधित रुग्णांना अत्यंत गुणकारी सिद्ध झाले आहे.
गोव्यातील ‘मिनरल अँड मरिन मेडिसिनल रिसोर्सिस’च्या विभागीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या वतीने ‘आयुष-६४’ औषध विनामूल्य देण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाच्या पाटो, पणजी येथील कार्यालयात कामाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या गोळ्या वितरित केल्या जाणार आहेत. संपर्कासाठी क्रमांक – कार्यालय (०८३२) २२३५६८८९, डॉ. एच्.के. गुप्ता – ०९४४९९६४५९८, डॉ. अजय यादव – ९०४९९२९३८९ किंवा सूरज नाईक – ९८५०५२४००२.