मलेशियामध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग श्‍वानांमधून !

प्रतिकात्मक छायाचित्र

कुआलालंपूर (मलेशिया) – संशोधकांना मलेशियात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या विषाणूची निर्मिती श्‍वानांपासून झाल्याची माहिती समोर येत असून काही वर्षांपूर्वी काही जणांना याची बाधा झाली होती. प्राण्यांपासून माणसांना बाधित करणार्‍या या विषाणूची पुष्टी झाल्यास असा हा ८ वा विषाणू असेल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सध्या जगभरात मनुष्यामध्ये संसर्ग पसरवू शकतात, असे कोरोना विषाणूचे ७ प्रकार आहेत.

१. विषाणूतज्ञ अनस्तासिया व्लासोवा यांनी सांगितले की, श्‍वानांमधून माणसांमध्ये कोरोना विषाणू संक्रमित होईल, असा विचारही कधी कुणी केला नसेल. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण अद्याप पुढे आलेले नाही.

२. मलेशियात श्‍वानांपासून कोरोनाबाधित झालेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्याखेरीज त्यांना या संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यांच्याकडून इतरांना बाधा झाल्याचेही आढळलेले नाही. त्यामुळे श्‍वानांमधील कोरोना विषाणूपासून साथ पसरण्याचा धोका नाही, असे तज्ञांनी सांगितले आहे.