सावंतवाडी – वेंगुर्ला, कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यांत गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत भूस्खलन झालेल्या शिरशिंगे, झोळंबे, तुळस आणि कुडाळ तालुक्यातील सरंबळ आदी गावांचे पुनर्वसन करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल. त्यामुळे या गावांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.
याविषयी आमदार केसरकर म्हणाले, ‘‘मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे मान्य केले आहे. जिल्ह्यातील वीजवाहिन्या भूमीगत करण्यासाठी ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याविषयीही मंत्री वडेट्टीवार सकारात्मक आहेत. गतवर्षी भूस्खलन झालेल्या गावांचे पुनर्वसन करण्याविषयीचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.’’