पुणे येथील प्रमुख सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन लेखापरीक्षणामध्ये आढळली गळती !

महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयातील ही स्थिती गंभीर आहे ! अशा प्रकारे गळती होत आहे, हे रुग्णालयात कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ? ही स्थिती पालटण्यासाठी त्वरित उपाय काढणे आवश्यक आहे !

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने सोनारपद्धती वापरून ऑक्सिजनचे लेखापरीक्षण चालू केले. त्यामध्ये ससून रुग्णालय, आर्मड फॉर्सेस मेडिकल कॉलेज (‘ए.एफ्.एम्.सी.’) यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (वाय.सी.एम्.) आणि जम्बो सेंटर या चारही प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गळती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी ‘ए.एफ्.एम्.सी.’मधील ऑक्सिजन पाईपलाईन मध्ये ४० ठिकाणी गळती असल्याचे दिसून आले.

शहर आणि जिल्ह्यातील उर्वरित सरकारी रुग्णालयांचे ऑक्सिजन लेखापरीक्षण बजाज आस्थापनाकडून सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस्.आर्.) निधीतून केले जाणार आहे. तर खासगी रुग्णालयांचे ऑक्सिजन लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांना ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण दिले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या नियंत्रणाखाली ऑक्सिजन लेखापरीक्षणाचे काम केले जात आहे. ऑक्सिजन नियोजन समितीचे सदस्य कौस्तुभ बुटाला त्यासाठी तांत्रिक साहाय्य करत आहेत. या लेखापरीक्षणासाठी पाईपलाईन मधील भेगा आणि त्यामधून होणारी ऑक्सिजनची गळती शोधण्यासाठी सोनारपद्धती वापरली जात आहे. ऑक्सिजनचा वापर करतांना गळती होऊ नये; म्हणून ‘ऑक्सिजन नर्स ’ ही संकल्पना राबवण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक रुग्णालयातील परिचारिकांकडे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी लक्ष ठेवण्याची जबाबदारीचे दायित्व देण्यात येणार आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.