पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन 

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना निवेदन देताना कार्यकर्ते

सांगली – देशावर आलेल्या कोरोनासारख्या संकटात सेवा देण्यात आधुनिक वैद्य आणि पोलीस अग्रभागी आहेत. पोलीस बांधव २४ घंटे रस्त्यावर उतरून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे सांगलीत महिला पोलिसावर आक्रमण करून विनयभंग करणारी व्यक्ती हा गुन्हेगार असून त्याने समाजसेवेचा बुरखा पांघरला आहे. तरी समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी येथील गरीब नवाज मशिदीसमोर महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेळ पडली तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान पोलिसांसमवेत असेल. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान महाराष्ट्राचा बंगाल आणि जम्मू-काश्मीर होऊ देणार नाही. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांच्यासह सर्वश्री सचिन मोहिते, सतीश खांबे, दत्ता पवार, विशाल गायकवाड, मोहन शिंदे, नीलेश चौगुले, अमोल बोळाज, सुरेंद्र इंगळे, युवराज जाधव, योगीराज माळी, प्रशांत देसाई, यशवंत शिंदे, नंदकुमार सावंत, अजिंक्य बोळाज, दिगंबर साळुंखे, अभिषेक आंबे उपस्थित होते.