२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
१. परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे आनंदाने आश्रमजीवन स्वीकारणे
‘२ वर्षांपूर्वी संतपद प्राप्त झाल्यावर पू. शालिनी माईणकरआजी रामनाथी आश्रमात रहायला आल्या. वयाच्या ८९ वर्षापर्यंत त्या संसारात राहूनच साधना करत होत्या. आजींची पूर्वपुण्याई, अनासक्त वृत्ती, त्यांनी केलेली साधना आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेली त्यांची अनन्य श्रद्धा यांमुळे मायेत राहूनही त्यांनी संतपद प्राप्त केले. खरेतर या वयात घराचा त्याग करून आश्रमात येऊन रहाणे, ही अत्यंत कठीण गोष्ट आहेे; पण परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे त्यांनी आश्रमजीवन आनंदाने स्वीकारले.
२. साधकांवर भरभरून प्रेम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या वात्सल्याचे मूर्तीमंत रूप असलेल्या ‘सनातनच्या पू. आजी’ !
पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या आणि निरपेक्ष प्रीती अन् वात्सल्यभाव यांमुळे त्यांनी सर्व साधकांवर भरभरून प्रेम केले. आश्रमात आल्यावर आरंभी त्यांची ओळख ‘सोनलची आजी’ (आश्रमातील साधिका कु. सोनल जोशी हिच्या आजी) अशी होती; पण निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करून अल्पावधीतच त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यामुळे ‘त्या ‘सनातनच्या पू. आजी’ केव्हा झाल्या ?’, ते कळलेही नाही. त्या सर्व साधकांवर प्रेम करायच्या आणि त्यांना आधार द्यायच्या. ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, याची त्यांना पुष्कळ तळमळ असायची.
मी कधी त्यांच्या खोलीत भेटायला गेले की, मला त्यांच्या मनाचा निर्मळपणा आणि त्यांचे वात्सल्य अनुभवायला मिळायचे. त्या आत्यंतिक प्रीतीने माझ्या पाठीवरून हात फिरवायच्या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रयत्न करण्यासाठी मनापासून आशीर्वाद द्यायच्या.
३. गुरुस्मरण, नामजप आणि निरंतर अनुसंधान यांतच मग्न असलेल्या पू. आजी !
पू. आजी समष्टीसाठी अखंड आणि तळमळीने नामजप करायच्या. गुरुस्मरण, नामजप आणि निरंतर अनुसंधान यांतच त्या मग्न असायच्या. ‘केवळ नाम आणि परात्पर गुरु डॉक्टर’, एवढेच त्यांचे भावविश्व राहिले होते. भावविश्वात असल्यामुळे त्यांना तहान-भूक यांचीही जाणीव होत नव्हती.
४. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
४ अ. पू. आजींचा देह चैतन्यमय वाटणे आणि वातावरणात भाव अन् आनंद यांचे तरंग प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : ११.५.२०२१ या दिवशी पू. माईणकरआजी यांनी देहत्याग केला. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना त्यांचा देह चैतन्यमय आणि सजीव वाटत होता. त्यांच्यातील चैतन्यामुळे ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे वाटतच नव्हते. ‘त्या कोणत्याही क्षणी उठून बसतील’, असे मला वाटत होते. पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर शांत वाटून ‘त्या स्थितीतही (देहत्यागानंतरही) त्या अनुसंधानात आहेत आणि गुरुचरणी आहेत’, असे वाटत होते. त्या वेळी वातावरणात भाव आणि आनंद यांचे तरंग प्रक्षेपित होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात पालट होऊन ते चैतन्यमय झाले होते.
४ आ. पू. आजींचे पार्थिव स्मशानात नेल्यानंतर आश्रमातील वातावरणात झालेले पालट ! : पू. आजींचे पार्थिव स्मशानात नेले. त्या वेळी आश्रमातील वातावरणात शीतलता जाणवू लागली. त्या वेळी आकाशातील रंगही पालटले आणि आकाशाचा रंग पिवळसर भगवा दिसू लागला.
४ इ. पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला शांत वाटत होते. ‘त्या देहत्यागानंतरही अनुसंधानात आणि गुरुचरणी आहेत’, असे वाटत होते.
५. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पू. आजी आश्रमात वास्तव्याला आल्याने त्यांची व्यापक स्तरावरील साधना होऊन त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व येणे
२ वर्षांपूर्वीच पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या आणि येथील समष्टी जीवनाशी त्या एकरूप झाल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्याकडून पुढील टप्प्याची व्यापक स्तरावरील साधना करून घेतली. त्यामुळे पू. आजींची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होऊन त्यांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर अनेक पालट झाले. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आश्रमात आल्याने त्यांच्या आयुष्याला एक पूर्णत्व आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यांची पुढील आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होणारच आहे.
आम्हा सर्वांना पू. आजींची निरपेक्ष प्रीती आणि त्यांचा चैतन्यमय सत्संग लाभला. त्याबद्दल पू. आजी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (२०.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |